Jode Maro Andolan In Mumbai: मुंबई मध्ये आज मविआ चे जोडे मारो आंदोलन; राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करणार
दरम्यान पंतप्रधानांच्या माफीनाम्यानंतरही मविआ आपल्या आंदोलनावर ठाम आहे.
राजकोट किल्ल्यावरील (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांचा ( Chhatrapati Shivaji Maharaj ) 35 फूटी पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी कडून मुंबई मध्ये 'जोडे मारो' आंदोलन (Jode Maro Andolan) होणार आहे. हुतात्मा चौक येऊन या आंदोलनाला सुरूवात होणार असून गेटवे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढला जाईल. या पुतळ्याजवळ ‘जोडे मारो’ आंदोलन होणार आहे.
राजकोट किल्ल्यावर उभारलेला महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यातच कोसळल्याने शिवप्रेमींनी त्याबद्दल राग व्यक्त केला आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली आहे. मात्र विरोधकांनी सरकारकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच सरकार वर भ्रष्टाचाराचे आरोप करत घडल्याप्रकरणी चौकशी आणि कडक कारवाईची मागणी केली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी सकाळी 10 वाजल्यापासून बंद राहणार आहे.
सरकार कडून राजकोट किल्ल्यावर नव्याने पुतळा बसवण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य सरकार कडून समिती स्थापन करण्ण्यात आली आहे. महाविकास आघाडीचं आंदोलन आज दुपारी 11 वाजल्यापासून हुतात्मा चौकातून सुरु होणार आहे. यामध्ये मविआ चे मोठे नेते सहभाग घेणार आहेत. ‘शिवद्रोह्यांना माफी मिळणार नाही,’ असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जनतेला केले आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या माफीनाम्यानंतरही मविआ आपल्या आंदोलनावर ठाम आहे. नक्की वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नट आणि बोल्ट गंजले होते; PWD ने दिलेल्या इशाऱ्याकडे केले दुर्लक्ष, अहवालात समोर आली माहिती.
आंदोलन राजकीय असल्याचा देवेंद्र फडणवीसांचा दावा
राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेमध्ये सल्लागार चेतन पाटील याला कोल्हापूर मधून अटक करण्यात आली आहे तर शिल्पकार जयदीप आपटे अद्याप फरार आहे. सरकार कडून शिवरायांचा पुतळा पडल्याच्या या प्रकारणाचं राजकारण होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नौदल दिना निमित्त 8 डिसेंबर 2023 दिवशी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र तो 8 महिन्यातच कोसळला असल्याने सध्या शिवप्रेमींच्या भावना सरकार विरूद्ध तीव्र झाल्या आहेत.