Jitendra Awhad On NCP Symbol Row: शरद पवारांनी कधीच लोकशाही तत्त्वांच्या पलीकडे काहीही केले नाही; जितेंद्र आव्हाडांची अजित पवार गटावर टीका
ज्यांच्यामुळे साडेअठरा वर्षे सत्ता उपभोगली, आयुष्यात सगळे मिळाले त्यांनीच शरद पवार यांच्याबद्दल अशी निवेदने वकिलामार्फत करायला लावणे हे दुर्दैव असल्याचे सांगत आव्हाड यांनी अजित पवार गटाचा चांगलाच समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोणाचा यावर सध्या निवडणूक आयोगात सुनावणी ही सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटी प्रकरणी शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांसमोर (Sharad Pawar) राष्ट्रवादीमध्ये (NCP) लोकशाही नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात आला होता. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर जोरदार टिका केली आहे. (हेही वाचा - Nawab Malik News: नवाब मलिक कोणाचे? अजित पवार गटाच्या दाव्यामुळे उलटसुलट चर्चा; 'तो' 42 वा आमदार कोण?)
शरद पवार साहेब स्वत: निवडणूक आयोगाच्या सुनावणीला हजर होते. त्यावेळेस त्यांच्या कानावरही शब्द आले, आमच्या कानावरही शब्द आले. समोरच्या पक्षाकडील वकिलाने अत्यंत उद्धटपणाने 'शरद पवार यांनी अध्यक्ष या नात्याने पक्ष चालवताना कधीच लोकशाही मूल्यांचे पालन केले नाही. एखाद्या हुकूमशहासारखा पक्ष चालवला' हे ते वारंवार बोलत होते. हे ऐकल्यानंतर मात्र डोळ्यांत अश्रू उभे राहिले. अशी प्रतिक्रीया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
पाहा पोस्ट -
ज्या माणसाने हे झाड लावले, मोठे केले, त्या माणसाला आज हे भोगावे लागत आहे. ज्यांच्यामुळे साडेअठरा वर्षे सत्ता उपभोगली, आयुष्यात सगळे मिळाले त्यांनीच शरद पवार यांच्याबद्दल अशी निवेदने वकिलामार्फत करायला लावणे हे दुर्दैव असल्याचे सांगत आव्हाड यांनी अजित पवार गटाचा चांगलाच समाचार घेतला.
ज्या माणसाने तुम्हाला प्रत्येक प्रसंगात साथ दिली. त्यांच्यावर तुम्ही आरोप करता, शरद पवारांनी सगळ्यांना साथ दिली. काहीच कोणाबद्दल द्वेष ठेवला नाही, अशा माणसाविषयी संस्थानिकांसारखे वागता, असे शब्द वापरले जातात. त्यांच्याबद्दल कालचे उद्गार अनाकलनीय होते, आपण आपल्या वकिलाला काय सांगितले, त्यांनी तुम्हाला काय सांगितले, हे मला माहीत नाही; पण तुमचे वकील यापुढे असे बोलणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन आव्हाड यांनी केले. पक्षात कधीच निवडणुका घेतल्या नाहीत, असे आरोप शरद पवार यांच्याबद्दल करणे योग्य नाही, असेही आव्हाड यांनी सांगितले.