ठरलं! 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची निवड

त्यामुळे या साहित्य संमेलनाला घेऊन निर्माण झालेल्या 2 महत्त्वांच्या प्रश्नांवर तोडगा अखेर निघाला असं म्हणायला हरकत नाही.

Jayant Narlikar (Photo Credits: Wikimedia Commons and Twitter)

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2021 (94th All India Marathi Sahitya Sammelan) च्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. ही उत्सुकता आता संपली असून ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि साहित्यिक जयंत नारळीकर (Jayant Narlikar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. साहित्य महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. यंदाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिक शहर अंतिम करण्यात आले आहे. त्यामुळे या साहित्य संमेलनाला घेऊन निर्माण झालेल्या 2 महत्त्वांच्या प्रश्नांवर तोडगा अखेर निघाला असं म्हणायला हरकत नाही.

दरवर्षी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी बरीच चुरस पाहायला मिळते. यंदाही अनेक नाव यासाठी चर्चेत होती. मात्र त्यात अखेर जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली. यंदा नाशिकमध्ये होणा-या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे 26 ते 28 मार्च 2021 दरम्यान होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.हेदेखील वाचा- 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार; छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आनंद

नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली. या त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. विवाहानंतर मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले.