Jalna Crime News: बायकोचे विवाहबाह्य संबंध, चिडलेल्या नवऱ्याकडून सासऱ्याची गोळ्या झाडून हत्या; जालना येथील घटना
तिच्या या वागण्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने सासऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. जालना जिल्ह्यातील (Jalna Crime News) अंबड तालुक्यातील रामगव्हाण येथे ही धक्कादायक घटना घडली.
Wife Extramarital Affair: चार मुलांची आई असलेली बायको आपल्याला आणि मुलांना मागे टाकून अचानक दुसऱ्या पुरुषाबरोबर राहायला गेली. तिच्या या वागण्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने सासऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. जालना जिल्ह्यातील (Jalna Crime News) अंबड तालुक्यातील रामगव्हाण येथे ही धक्कादायक घटना घडली. ज्यामुळे परिसर हादरुन गेला असून एकच खळबळ उडाली आहे. किशोर शिवदास पवार असे आरोपीचे नाव आहे. आरोपी मूळचा अंबड तालुक्यातील रामगव्हाण येथील रहिवासी आहे. मात्र, तो पाचोड येथे स्थायिक झाला असून सध्या अडसूळ येथे राहात होता.
आरोपी किशोर शिवदास पवार याचा विवाह त्याचे मामा पंडित भानुदास काळे यांच्या मुलीसोबत झाला होता. विवाहाला 12 वर्षे पूर्ण झाली. या विवाहातून पवार दाम्पत्यास चार अपत्ये झाली. संसाराला बारा वर्षे पूर्ण झाली होती. सर्व काही सुरळीत सुरु होते. असे असताना अचानक एक दिवस शिवदास पवार यांच्या पत्नीने घर सोडले. घरातून बाहेर पडल्यावर ती पाचोड येथे एका दुसऱ्या पुरुषासोबत राहू लागली. अचानक असे काय घडले म्हणून किशोरही संभ्रमात पडला. पण त्याचा हा संभ्रम पुढे रागात परावर्तीत झाला. (हेही वाचा, Jalna Murder Case: पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून आपल्या मित्राची हत्या, आरोपी अटकेत)
चार मुले आणि आपल्याला सोडून पत्नीने दुसऱ्या पुरुषासोबत राहायला जाणे हे किशोर पवार याच्या जिव्हारी लागले होते. त्यातून पत्नीने असे काही वर्तन करण्यास तिच्या वडिलांनी म्हणजेच सासऱ्यानेच (पंडीत काळे) चिथावणी दिली असावी असा संशय किशोरच्या मनात होता.
संतापाने बेभान झालेला किशोर बुधवारी (29 मार्च) सकाळी आपल्या दोन मित्रांसोबत पल्सरवरुन अंबड येथे आला. मागचापुढचा काहीच विचार न करता त्याने आपला नात्याने मामा आणि सासरा लागत असलेल्या पत्नीच्या वडीलांवर गावठी पिस्तूलातून दोन गोळ्या झाडल्या. किशोरच्या पिस्तूलातून सुटलेली एक गोळी पंडित काळे यांच्या डोक्यात आणि दुसरी पाठीत लागली. ज्यामुळे पंडित काळे यांचा जागीच मृत्यू झाला. पंडित काळे याचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी किशोर आणि त्याच्या मित्रांनी पिस्तूलासह पळ काढला.