India-China Face-Off in Ladakh: भारत-चीन सीमावादाविरुद्ध सर्व भारतीयांनी एकत्रित येत आवाज उठवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड
चीनी आक्रमकतेविरुद्ध देशवासियांनी एकत्रित यावे आणि भारतीय सैन्याला पाठींबा दर्शवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
भारत-चीन सीमावाद पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. यावरुनच लडाखच्या (Ladakh) गलवान खोऱ्यात (Galwan Valley) भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या 20 जवानांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली आहे. त्यानंतर सीमा भागात सैन्यांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भारत-चीन सीमावादावर ट्विटच्या माध्यमातून आपले मत मांडले आहे. चीनी आक्रमकतेविरुद्ध देशवासियांनी एकत्रित यावे आणि भारतीय सैन्याला पाठींबा दर्शवावा असे आवाहन त्यांनी केले आहे. (भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही, जशास तसे उत्तर देण्यास भारत सक्षम- पंतप्रधान नरेंद्र मोदी)
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिले, "आज चीन गलवान व्हॅली हा त्यांचा भाग असल्याचा दावा करत आहे. उद्या लडाख चीनचा आहे, असे म्हणतील. सर्व भारतीयांनी एकत्रित येत सर्व माध्यमातून याबद्दल बोलण्याची ही वेळ आहे. चीनी आक्रमकतेला विरोध दर्शवा आणि भारतीय सैन्याला पाठींबा द्या."
Jitendra Awhad Tweet:
गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले. तर 17 जवान गंभीररित्या जखमी झाले. चीनचे देखील 43 जवान जखमी झाले आहेत. याचे पडसाद देशभरात उमटत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. चीनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation of All India Traders) यांनी देखील चीनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. तसंच या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.