Saamana Editorial: मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या नटीला भाजपचा पाठिंबा मिळणं अत्यंत दुर्दैवी; सामनातील रोखठोक सदरातून संजय राऊत यांचा विरोधी पक्षावर निशाणा

शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा कंगना तसेच भाजपवर निशाणा साधला आहे. यापूर्वी लिहिलेल्या अग्रलेखात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करत कंगनाला सुनावलं होतं. तसेच यावेळी सामनाच्या अग्रलेखातून कंगनाची पाठराखण करणाऱ्या भाजप पक्षावर टीकास्त्र डागल आहे.

Kangana Ranaut And Sanjay Raut (Photo Credits: PTI)

Saamana Editorial: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) मुंबई संदर्भातील वक्तव्यामुळे शिवसेना आणि कंगनामधील शाब्दिक चकमक अधिकचं तीव्र होताना दिसून येत आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा कंगना तसेच भाजपवर निशाणा साधला आहे. यापूर्वी लिहिलेल्या अग्रलेखात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करत कंगनाला सुनावलं होतं. तसेच यावेळी सामनाच्या अग्रलेखातून कंगनाची पाठराखण करणाऱ्या भाजप पक्षावर टीकास्त्र डागल आहे.

मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या, मुंबईचा अपमान करणाऱ्या नटीच्या मागे भाजपा उभा राहतो, हे दुर्दैवी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एक नटी मुंबईत बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविरुद्ध एकेरी भाषा बोलते. आव्हानाची भाषा करते व त्यावर महाराष्ट्राच्या जनतेने काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही हे कसले एकतर्फी स्वातंत्र्य? तिच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा पडला तेव्हा हे तर माझे राम मंदिरच होते असा कांगावाही तिने केला. पण हे बेकायदेशीर बांधकाम तिने कायद्याचे उल्लंघन करुन ती सांगत असलेल्या पाकिस्तानात बांधले. मुंबईला ‘पाकिस्तान’ म्हणायचे व या ‘पाकिस्ताना’तल्या बेकायदेशीर कामांवर सर्जिक स्ट्राईक केला की छाती पिटायची, हा कसला खेळ? असा सवालदेखील संजय राऊत यांनी केला आहे.

संपूर्ण नव्हे, निदान अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीने तरी मुंबईच्या अवमानासंदर्भात व्यक्त व्हायलाच हवे होते. कंगनाचे मत हे संपूर्ण सिनेसृष्टीचे मत नाही, असे सांगायला हवे होते. निदान अक्षय कुमार वगैरे मोठ्या कलावंतांनी तरी समोर यायला हवं होते. मुंबईने त्यांनाही दिलेच आहे. जगभरातील श्रीमंतांची घरे मुंबईत आहेत. मुंबईचा अवमान होत असताना ते सगळेच खाली मान घालून बसतात. मुंबईचे महत्त्व फक्त ओरबडण्यासाठी व पैसे कमावण्यासाठीच आहे. मग मुंबईवर कोणी रोज बलात्कार केला तरी चालेल. या सगळ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, ‘ठाकरे’ यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरुन अस्मितेसाठी राडे करण्याची आज गरज नाही. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भाग्यचक्र मुंबईभोवतीच फिरत आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. मुंबई महाराष्ट्राच्या बापाची आहे, असं रोखठोक मतही राऊत यांनी अग्रलेखात मांडल आहे. (हेही वाचा -

महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरु झाले आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहे. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईस पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अपमान करणाऱ्या एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली तेव्हा महापालिकेचा उल्लेख बाबर असा करण्यात आला. मुंबईला आधी पाकिस्तान आणि नंतर बाबर म्हणणाऱ्यांमागे भारतीय जनता पक्ष उभा राहतो हे दुर्दैवच म्हणायला हवे. मुंबई विरोधा 60-65 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांनी पद्धतशीर कारस्थाने केली. त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय ठेवून मराठी माणसाने भगवा झेंडा फडकवला. भाजपाचे एक प्रमुख नेते आशिष शेलार यांचे असे म्हणणे आहे की ‘ज्या काँग्रेसने मराठी आंदोलकांवर गोळ्या झाडल्या त्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत आहे.’ भाजपा नेत्यांचा इतिहास कच्चा आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान, कोणाही उठावे आणि मुंबई-महाराष्ट्रावर चिखलफेक करावी, हे आता चालणार नाही. दिल्ली किंवा महाराष्ट्रात सरकार कुणाचेही असो. एखादी अज्ञात शक्ती मुंबईच्या विरोधात पद्धतशीरपणे कारस्थान करत असते. पण संयुक्त महाराष्ट्रासाठी तुरुंगाच्या दारात रांग लावणारा मगरट्टा आज निष्प्रभ झाला काय? भाजपा त्याच्या राष्ट्रीय धोरणानुसार भूमिका घेत आहे. अशीच राष्ट्रीय भूमिका पूर्वी काँग्रेस घेत असे, हे विसरता येणार नाही. आता पुन्हा एकदा मराठी माणसाचे आणि अस्मितेचे पद्धतशीर खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राच्या रक्तातील मराठी पेशी मारण्याचे काम सुरू आहे, असं परखड मतदेखील अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे.

'राज ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या ठाकरे ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,' असं म्हणत राऊत यांनी राज ठाकरे यांनाही साद घातली आहे.