Ajit Pawar On EVM: आपल्या देशात ईव्हीएममध्ये फेरफार करणे शक्य नाही; अजित पवार यांचा विश्वास

ईव्हीएममध्ये बिघाड असता तर छत्तीसगड, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विरोधी पक्ष सत्तेत नसते, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar | (Photo Credit - ANI)

Ajit Pawar On EVM: महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी ईव्हीएमवर (EMI) विश्वास व्यक्त केला. ईव्हीएमवर 'वैयक्तिकरित्या' पूर्ण विश्वास असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं आहे. ईव्हीएममध्ये बिघाड असता तर छत्तीसगड, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विरोधी पक्ष सत्तेत नसते, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. आपल्या देशात ईव्हीएममध्ये फेरफार करणे शक्य नाही. ही एकंदरीत मोठी यंत्रणा आहे. तत्पूर्वी, पक्षाचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सात आमदार अनरिचेबल असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घबराट पसरली होती. अजित पवार यांनी काल त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले. अजित पवार अनरिचेबल झाल्यानंतर, ते महाविकास आघाडी (MVA) वर नाराज असल्याची अटकळ बांधली जात होती.

मात्र, या आरोपांचे खंडन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला. अजित पवार यांनी शनिवारी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र दौर्‍यानंतर त्यांची तब्येत खराब असल्याने त्यांनी शुक्रवारचे कार्यक्रम रद्द केले. मीडियाने अशा मुद्द्यांवर उहापोह करू नये. कारण, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला असल्याचे पवार यांनी सांगितलं. (हेही वाचा - Ajit Pawar on Sharad Pawar Interview: शरद पवारांची भूमिका हीच आमची आणि पक्षाची भूमिका - अजित पवार)

अजित पवार यांनी सांगितलं की, 'माझी तब्येत बिघडली होती म्हणून मी शुक्रवारचे नियोजित टूर आणि कार्यक्रम रद्द केले. गेल्या काही दिवसांपासून मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो आणि पुरेशी विश्रांती घेतली नाही. योग्य झोप न मिळाल्याने फुफ्फुसाचा त्रासही वाढत होता. मी औषधे घेतली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी विश्रांती घेतली.'

अदानी प्रकरणावर शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले की, ही पक्षाची भूमिका आहे. मी टीव्हीवर शरद पवारांची मुलाखतही पाहिली. ते आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांनी एखाद्या विषयावर भूमिका घेतली तर आम्ही त्यावर पुन्हा चर्चा करणार नाही. त्यांची भूमिका ही आमचीही भूमिका आहे.