'पेट्रोल, डिझेलची महागाई, जवानांचे शिरच्छेद हेच हिंदुस्थानचे भविष्य आहे काय?'
पुढची पन्नास वर्षे कुणाला राज्य हवे असेल तर सरसंघचालकांनी वडीलकीच्या नात्याने राज्यकर्त्यांचे कान उपटायला हवेत, पण आज सत्य बोलायला कुणी तयार नाही.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगतात की, देशात पन्नास वर्षे भाजपचेच राज्य राहील, पण 370 कलम रद्द करू किंवा राम मंदिर नक्की कधी बांधू यावर ते बोलत नाहीत. पेट्रोल, डिझेलची महागाई आणि जवानांचे शिरच्छेद हेच हिंदुस्थानचे भविष्य आहे काय? ,असा थेट सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
राष्ट्रीये स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राजधानी दिल्लीत केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान, भागवत यांच्या भाषणाचा धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये लिहीलेल्या लेखात ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
पुढची पन्नास वर्षे भाजपचेच राज्य राहिल असे, सांगणाऱ्या भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विधानावर टीका करताना ठाकरे म्हणतात, पुढची पन्नास वर्षे कुणाला राज्य हवे असेल तर सरसंघचालकांनी वडीलकीच्या नात्याने राज्यकर्त्यांचे कान उपटायला हवेत, पण आज सत्य बोलायला कुणी तयार नाही. गोरक्षणाच्या नावावर जो उन्माद झाला, माणसे मारली गेली. त्याच्याशी संघाचा संबंध नाही असे श्री. भागवत यांनी सांगितले, पण गोरक्षकांच्या झुंडीच्या झुंडी हिंसा करायला रस्त्यावर उतरल्या तेव्हा हिंदू मतांच्या धुवीकरणाची नवी पहाट उगवल्याच्या आनंदात सगळे बेहोश झाले. गाय, गोवंश वगैरेंचा संबंध हिंदुत्वापेक्षा शेतकर्यांच्या अर्थकारणाशी आहे हे त्यावेळी एखाद्या ज्येष्ठाने समजावून सांगितले असते तर शेतकर्यांचे भले झाले असते. गोरक्षकाच्या झुंडशाहीमुळे गोवंशाचा बाजार, व्यापार थंडावला. गोवंशांची वाहतूक कोणी करत नाही. त्याचा परिणाम दुधाच्या किरकोळ व्यापार्यांवर झाला. या स्थितीत सामान्य माणसांचेच खायचे वांदे झाले तेथे भाकड गाई-बैलांची काय कथा? उलट त्यांच्यासाठी आता शेतकर्यांना तजवीज करावी लागत आहे. हे चित्र हिंदूंच्या भविष्यासाठी बरे नाही. देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न हे राम मंदिराच्या स्वप्नासारखे अधांतरी लटकू नये, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.