सिंहगडावर मिळाली ऐतिहासिक भेट, तानाजी मालुसरे यांची देहसमाधी सापडली
ही समाधी सापडल्यानंतर शिवप्रेमी आणि तानाजी मालुसरे यांच्या अनुयायांनी आनंद व्यक्त केला आहे.
सिंहगडावर (Sinhagad) नरवीर तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांच्या देहसमाधी रुपात राज्याला एक नवी ऐतिहासिक भेट (Historical Gift) मिळाली आहे. पुणे महापालिकेच्या वतीने सिंहगडावर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व पुतळा सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. पुरातत्व विभागाच्या मान्यतेनंतर साफसफाई आणि खोदकाम करत असताना ही समाधी उपस्थितांच्या हाती लागली. ही समाधी सापडल्यानंतर शिवप्रेमी आणि तानाजी मालुसरे यांच्या अनुयायांनी आनंद व्यक्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सिंहगडावर साफसफाई आणि खोदकाम करताना कामगारांनी तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाजवळचा सिंमेट काँक्रीटचा ठाकळा काढला. तर, त्याच्याखाली एक चौकौनी दगड आढळून आला. तो दगड बाजूला करताच त्याच्याखाली समाधीचे वृंदावन सापडले. पुतळ्याशेजारी असलेल्या चौकोनी दगडावर समाधीचा जो शिरोभाग होता त्यालाच आजवर मासुलसे यांची समाधी म्हणून ओळखले जात होते. परंतू, आता नव्याने सापडले अवशेष जोडले असता ती मालुसरे यांची मूळ समाधी असल्याचे दिसून आले. (हेही वाचा, Tanaji First Poster : अजय देवगण रुपेरी पडद्यावर साकारणार योद्धा तानाजी मालुसरे)
दरम्यान, तानाजी मालूसरे यांच्या मृत शरीराला उमरठ येथे अग्नी देण्यात आला होता. त्यामुळे उमरठ येथे असलेली समाधी ही अग्नी समाधी आहे. शिवरायांच्या राज्यासाठी अनेक मावळ्यांनी दिलेल्या बलीदानाची आणि परिक्रमाची साक्ष म्हणजेच ही समाधी असल्याचे तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे यांनी म्हटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. तानाजी मालुसरे यांची 349 वी पुण्यतिथी लवकरच येत आहे. या पुण्यतिथीपूर्वीच अशी समाधी सापडणे म्हणजे एक दुर्मिळ योगायोग असल्याचे मानले जात आहे.