Inflated Power Bills: महावितरण कंपनीकडून नरमाईची भूमिका; वीज बिल न भरलेल्यांची वीज कापण्याच्या कारवाईला ब्रेक
वीज बीलाची एकरकमीपेक्षा हप्त्यांच्या माध्यमातून पूर्तता करण्यासाठी आवाहन केलं जात आहे.
महाराष्ट्रात कोरोना संकट काळामध्ये वाढीव वीज बिलं महावितरण कंपन्यांनी दिल्याने अनेकांनी संताप व्यक्त करत वीज दर कमी करण्याचे, वाढीव बीलांचा पुन्हा विचार व्हावा अशी मागणी केली होती मात्र महावितरण कंपन्यांनी वीज बिल न भरल्यास कनेक्शन कापण्याची धडक कारवाई सुरू केली होती. मात्र त्याचे तीव्र पडसाद उमटू लागल्याने महावितरण कंपनी आता एक पाऊल मागे घेतले आहे. आता कनेक्शन तोडण्याऐवजी बिल भरण्याची विनंती ग्राहकांना केली जात आहे. वीज बीलाची एकरकमीपेक्षा हप्त्यांच्या माध्यमातून पूर्तता करण्यासाठी आवाहन केलं जात आहे. ठाणे: वीज कापण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी दिली समज.
दरम्यान एप्रिल 2020 पासून एकही वीज बील न भरलेल्या ग्राहकांची वीज तोडा असा इशारा पश्चिम महाराष्ट्रात देण्यात आला होता. मात्र यावर जनतेतून आणि विरोधकांकडून पुन्हा संतप्त प्रतिक्रिया आल्याने कंपनीने आपली भूमिका मवाळ केली आहे. महाराष्ट्र टाईम्सच्या बातमीनुसार, अहमदनगर जिल्ह्यामध्ये मागील 10 महिन्यांत एकही वीज बिल न भरलेले 59,000 ग्राहक आहे. त्यामुळे महावितरणाचे सुमारे 33 कोटी थकबाकी आहे. महावितरणाचं आर्थिक संकट पाहता अशा ग्राहकांची वीज तोडा असे आदेश होते मात्र आता सरकारने कंपन्यांना थोडं सबुरीने घेण्याचं आवाहन केले आहे. नागपूर मध्ये महावितरणा कडून थकीत वीज बील न भरणार्यांची 'बत्ती गुल' करण्याला सुरूवात.
महाराष्ट्रात एकदाही वीज बिल न भरलेल्यांची संख्या ४१ लाख ७ हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील ८० लाख ३२ हजार ग्राहक इतकी आहे. आता वीज कंपन्यांकडून सार्यांनाच सुरूवातीला बीलाच्या 2% रक्कम भरा आणि उर्वरीत रक्कम हप्त्याने भरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठी उपविभाग कार्यालयांमध्ये अर्ज करण्याचं आवाहन देखील करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी मनसे, भाजपाने वाढीव वीज बिलांविरोधात आवाज उठवत सरकारला वीज दर कमी करण्याचं आवाहन केले होते. दरम्यान हा वाढीव वीज बिलाचा त्रास केवळ सामान्यांचा नसून अनेक सेलिब्रिटींनी देखील वाढीव वीजबील आल्याने आश्चर्य व्यक्त केले होते.