महाराष्ट्र: पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदोरीकर महाराज यांना आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
यावरील पुढील सुनावणी आज होणार आहे.
पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त विधान करणा-या कीर्तनकार इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांना संगमनेर न्यायालयाने आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या वादग्रस्त विधानावर PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची पहिली सुनावणी 3 जुलैला संगमनेर न्यायालयात (Sangamner Court) झाली होती, त्यावेळी समन्स बजावण्यात आला होता. यावरील पुढील सुनावणी आज होणार आहे. दरम्यान इंदोरीकर महाराज कोर्टात हजर राहण्यापासून ते आज काय भूमिका मांडतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
इंदुरीकर महाराजांनी पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अनेक सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी रंजना गवांदे यांच्या तक्रारीनंतर 26 जून रोजी संगमनेर कोर्टात PCPNDT कायद्यानुसार इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काय म्हणाले होते इंदोरीकर महाराज -
इंदोरीकर महाराजांनी ओझर येथे झालेल्या किर्तनात 'सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा जन्मास येईल आणि विषम तारखेला स्त्री संग केल्यास मुलगी होते', असं वादग्रस्त वक्तव्य केलं होते. इंदोरीकर यांचे हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असल्याचा आरोप PCPNDT (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act, 1994) समितीच्या सदस्यांनी केला होता.
अपत्यप्राप्तीसाठी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी वाद टोकाला गेल्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. इंदोरीकर महाराज यांनी पत्रक जाहीर करुन दिलगिरी व्यक्त केली होती. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं त्यांनी पत्रकात म्हटलं होतं.