Maharashtra: नाशिक, धुळे, नंदुरबार येथील 31 ठिकाणी आयकर विभागाचे छापे, 240 कोटींची रोकड आणि मालमत्ता जप्त

यामध्ये 6 कोटी रोख, 5 कोटींच्या दागिन्यांचा समावेश आहे. इतकी संपत्ती आणि रोख रक्कम कशी जमा झाली? आतापर्यंत या घोटाळ्यांकडे कोणाचेच लक्ष का गेले नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Income Tax | Representational Image | (Photo Credits: File Image)

आयकर विभागाने (Income Tax Raids) महाराष्ट्रातील (Maharashtra) नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यात 240 कोटी रुपयांची मालमत्ता आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे व्यापारी, सरकारी कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या निशाण्यावर होते. गेल्या काही दिवसांपासून आयकर विभाग आणि ईडीकडून (ED) वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरू आहे. या छाप्यांमध्ये काही मोठे मासेही पकडण्यात आले आहेत. या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात आयकर विभागाचे छापे सुरू झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने गेल्या पाच दिवसांत उत्तर महाराष्ट्रात 31 ठिकाणी छापे टाकले आहेत. नाशिक, धुळे, नंदुरबार येथे टाकलेल्या या छाप्यांमध्ये सुमारे 240 कोटींची रोकड आणि मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये 6 कोटी रोख, 5 कोटींच्या दागिन्यांचा समावेश आहे. इतकी संपत्ती आणि रोख रक्कम कशी जमा झाली? आतापर्यंत या घोटाळ्यांकडे कोणाचेच लक्ष का गेले नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बेहिशोबी मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

जमीन खरेदी विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाने छापेमारीत जप्त केलेलं कोट्यवधींचं घबाड मोजण्यासाठी तब्बल 12 तास लागले आहेत. छाप्यात सोन्याचे बिस्किट्स, मौल्यवान हिरे सापडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. छापेमारीत आढळलेली सर्व बेहिशोबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली असून संशयित आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. (हे ही वाचा Maharashtra: पुण्यात चोरट्यांनी स्फोटकांच्या सहाय्याने फोडले एटीएम मशीन, पळवली 16 लाखांची रोकड.)

मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईसाठी 22 वाहनांची सेवा घेण्यात आली असून 174 कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मिळून विविध ठिकाणी छापे टाकले. या सर्व अधिकाऱ्यांनी छोटी-छोटी टीम बनवून वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचून छापे टाकले. अधिकार्‍यांची छोट्या तुकड्यांमध्ये विभागणी केल्यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकले जाऊ शकतात. अधिका-यांच्या पथकासह पोलीस पथके उपस्थित होती आणि चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.