Maharashtra Govt Formation: महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात भाजपला 22, शिंदे सेनेला 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रीपदे; मुख्यमंत्रीपदाबाबत अजूनही सस्पेन्स- Report
एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, भाजप मुख्य पोर्टफोलिओवर वाटाघाटी करत आहे, ज्यात गृहखातेदेखील आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या (Mahayuti) दणदणीत विजयानंतर आता राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अंतिम निर्णय घ्यायचा आहे. मात्र, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गुरुवारी (28 नोव्हेंबर) रात्री उशिरा अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि इतर महायुतीच्या नेत्यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. आता या बैठकीनंतर मंत्रिमंडळ वाटपाबाबत माहिती समोर आली आहे.
अहवालानुसार मंत्रिमंडळात 42 मंत्र्यांचा समावेश असेल, ज्यात भाजपचे 22, शिवसेनेचे 12 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे 10 मंत्री असतील. एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, भाजप मुख्य पोर्टफोलिओवर वाटाघाटी करत आहे, ज्यात गृहखातेदेखील आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोणाला काय मिळणार हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयाचे आपण पालन करू, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी बुधवारी फडणवीस यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा केला. ते म्हणाले, ‘मी अडवणूक करणार नाही. पंतप्रधान मोदी जे निर्णय घेतील त्यावर आमचा विश्वास आहे.’ वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युतीच्या स्थिरतेला प्राधान्य देण्याची त्यांची इच्छा त्यांच्या टिप्पण्यांनी दर्शविली. अनेक अहवाल सांगतात की, नवीन सेटअपमध्ये शिंदे यांची भूमिका अनिश्चित आहे. त्यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली जाऊ शकते किंवा त्यांना केंद्रात ऑफर दिली जाऊ शकते. मात्र, शिवसेनेच्या सूत्रांच्या हवाल्याने ते राज्य मंत्रिमंडळात राहू शकतात, असे म्हटले जात आहे. (हेही वाचा: Maharashtra Government Formation: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पाठींबा! भाजपचाचं होणार पुढचा मुख्यमंत्री; जाणून घ्या अमित शहांसोबतच्या बैठकीत आतापर्यंत काय घडले)
दरम्यान, दिल्लीत अमित शहांसोबत सुमारे तीन तास झालेल्या बैठकीनंतर तिन्ही नेते मुंबईत परतले असून आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये विभागांची चर्चा करण्यासाठी मुंबईत मोठी बैठक होणार होती. मात्र एकनाथ शिंदे अचानक सातारा जिल्ह्यातील त्यांच्या गावी रवाना झाल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे आजची सभा पुढे ढकलण्यात आली आहे. शनिवारी ते साताऱ्याहून परतल्यानंतर पुन्हा ही बैठक होणार असून त्यात उर्वरित सर्व विषयांवर चर्चा होणार आहे.