केंद्र आणि राज्याच्या blame game मध्ये जनतेचाच game होतोय- मनसे नेते संदीप देशपांडे

यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महराष्ट्र दिनी सूचक वक्तव्य केलं आहे.

Sandeep Deshpande (Photo Credits: Facebook)

देशासह राज्यातील कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संकट अत्यंत गंभीर झालं आहे. कोरोना रुग्णवाढ, मृतांचा आकडा आणि डळमळीत झालेली आरोग्य व्यवस्था यामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे. यात गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वेगवेगळ्या मुद्यांवरुन वाद होत आहेत. यावर मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी महाराष्ट्र दिनी सूचक वक्तव्य केलं आहे. केंद्र आणि राज्याच्या blame game मध्ये जनतेचाच game होतोय, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "जुनी म्हणं आहे भीक नको पण कुत्र आवर आता म्हणावंस वाटतंय लस नको पण भांडण आवर. केंद्र आणि राज्याच्या blame game मध्ये जनतेचाच game होतोय. दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे फक्त गाण्यातच म्हणायचं की तशी धमक महाराष्ट्र सरकार दाखवणार आहे. असो, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा." (अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? ठाकरे सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नाही म्हणून कोरोना आकडे वाढवून सांगण्यात येतायेत - संदीप देशपांडे)

संदीप देशपांडे ट्विट:

रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, कोविड-19 लस यावरुन महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर वारंवार टीका करत आहे. आरोग्य सुविधा पुरवण्याबाबत केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत दुजाभाव करत असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. तर आपलं अपयश लपवण्यासाठी राज्य सरकार केंद्रावर टीका करत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. यात जनतेची मात्र कोंडी होत आहे. त्यामुळेच 'लस नको पण भांडण आवर' असं देशपांडे म्हणतात. त्याचबरोबर त्यांनी 'दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे फक्त गाण्यातच म्हणायचं की तशी धमक महाराष्ट्र सरकार दाखवणार आहे', असा सवालही राज्य सरकारला केला आहे.