नोटबंदीनंतर बनावट नोटांचा, भ्रष्टाचाराचा सुळसुळाट घाऊक पद्धतीने वाढला - शिवसेना
घरी दारू पिऊन लोक गाडय़ा चालवणार नाहीत याची गॅरंटी काय?'
'मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला तो भ्रष्टाचार, काळा पैसा व बनावट नोटा रोखण्यासाठी, पण उलट बनावट नोटांचा आणि भ्रष्टाचाराचा सुळसुळाट घाऊक पद्धतीने वाढला आहे', अशी टीका करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे. दरम्यान,' घरपोच दारु सेवेच्या मुद्द्यावरुन राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारलाही सणसणीत टोला लगावला आहे. 'महाराष्ट्रात पाण्याचा दुष्काळ पडला आहे हे तर माहीत आहे, पण अकलेचा दुष्काळ पडला आहे की काय, अशी शंका यावी असा सगळा हा प्रकार आहे. घरी दारू पिऊन लोक गाडय़ा चालवणार नाहीत याची गॅरंटी काय?' असा सवाल विचारत 'दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी समस्त महिलावर्गास दिलासा देण्यासाठी रात्रीचे डान्स बार बंद केले. त्या निर्णयाशी ते शेवटपर्यंत ठाम राहिले. विद्यमान सरकारने घरोघरी ‘बार’ उघडण्याचा परवाना देऊन ‘क्रांतिकारक’ पाऊल टाकले', असा उपहासात्मक टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे.
'सामना' या शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनिकात उद्धव ठाकरे यांनी 'बूँद से गयी वो…'नावाचा लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी 'घरपोच दारु पुरवठा' या मुद्द्यावरून राज्य सरकारमध्ये असलेल्या संभ्रमावरुन जोरदार टीका केली आहे. लेखामध्ये उद्धव ठाकरे म्हणतात, 'आमच्या देशात काय चालले आहे तेच कळत नाही, पण गेल्या साठ वर्षांत देशात काहीच झाले नाही. अगदी सुई-दोऱ्याचीदेखील निर्मिती झाली नाही असे म्हटल्यावर भगतगण टाळ्या वाजवतात. आता त्यांच्यासाठी ‘अच्छे दिना’ची घोषणा शिवरायांच्या महाराष्ट्रात झाली आहे. डिजिटल इंडियात इतर काही मिळाले नसले तरी महाराष्ट्र सरकारने ‘ऑनलाइन दारू विक्री’ची योजना जाहीर करून धमाल उडवून दिली आहे. आता घरपोच दारू समस्त तळीरामांना मिळू शकेल. साठ वर्षांत कोणत्याही सरकारला जे करता आले नाही असे हे भव्यदिव्य काम करून जाहीरनाम्यात नसलेल्या वचनपूर्तीचा झेंडा राज्य सरकारने फडकवला आहे'. (हेही वाचा, राफेल डील: काहीच उरले नाही, आता काय लपवणार? चेटूकगिरी करुनही भूत उतरणार नाही: उद्धव ठाकरे)
'मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला तो भ्रष्टाचार, काळा पैसा व बनावट नोटा रोखण्यासाठी, पण उलट बनावट नोटांचा आणि भ्रष्टाचाराचा सुळसुळाट घाऊक पद्धतीने वाढला आहे. बनावट दारू प्रकरणाचे तसेच व्हावे, पण सरकारला तळीरामांची इतकी काळजी आहे की, त्यांनी शुद्ध पहिल्या धारेचीच प्यावी यासाठी सरकारने किती कष्ट घेतले आहेत पहा. देशात सर्वाधिक भूकबळी गेल्याचे आकडे समोर आले. बेरोजगारीही कोटी कोटीने वाढते आहे. त्यावर उतारा म्हणून हा घरपोच दारूविक्रीचा फंडा काढला आहे का? धन्य आहे या सरकारची व त्यातील अकलेच्या कांद्यांची. या व्यवहारातून म्हणे सरकारला महसूल मिळणार आहे. सरकारला किती महसूल मिळणार आहे ते माहीत नाही, पण दारू निर्मात्यांशी झालेल्या मोठय़ा ‘डील’नंतर हा निर्णय घेतला असावा. ही सोय जशी भाजपात घुसवलेल्या ‘वाल्यां’ची आहे तशी दारू उत्पादकांची आहे. या सगळ्या व्यवहारातून निवडणुका लढविण्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल आधीच झाली आहे. भाजपवाले पैशांचा पाऊस कुठून पाडतात याचे उत्तर महाराष्ट्राला मिळाले आहे', असे ठाकरे यांनी म्हटले आहे.