कोरोना व्हायरस संकट काळात BMC ने जारी केले महत्वाचे नियम; रस्त्यावर थुंकल्यास होणार 1000 रुपये दंड, जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वात जास्त म्हणजेच 41 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. अशात केंद्र आणि राज्य सरकार या व्हायरसशी दोन हात करण्यासाठी सज्ज होत आहेत
देशात कोरोना व्हायरसचे (Corona Virus) संकट आ वासून उभे आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वात जास्त म्हणजेच 41 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. अशात केंद्र आणि राज्य सरकार या व्हायरसशी दोन हात करण्यासाठी सज्ज होत आहेत. सध्याची परिस्थिती महाराष्ट्र सरकारने अनेक उपाय योजना केल्या आहेत. मंगळवारी, कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC) लोकांनी एकटे राहण्यासाठी आपल्या आदेशात बदल केला. महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी जारी केलेल्या नव्या निर्देशानुसार, जिम, मॉल, गिरणी कंपाऊंड, स्पा सेंटर, क्लब, पब, डिस्को, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि इतर करमणूक उद्याने मुंबईत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय सर्व खासगी आणि सार्वजनिक कंपन्यांना, कोणत्याही दिवशी केवळ 50% कर्मचार्यांनाच कार्यालयात येण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोर्ट, वीज, पेट्रोलियम, तेल, ऊर्जा, दूरसंचार, इंटरनेट, बँकिंग, मेडिकल, माध्यमे, रेल्वे, वाहतूक अशा क्षेत्रांना आवश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांच्या यादीमध्ये समाविष्ट केले गेले आहे. म्हणजेच फक्त 50 टक्केच स्टाफ कामावर असणे या नियमातून यांना वगळण्यात आले आहे. शिवाय, सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे व ही गोष्ट कटाक्षाने पाळली जाईल याकडे लक्ष देण्यात येणार आहे. (हेही वाचा: चीनचे अध्यक्ष Xi Jinping आणि राजदूत Sun Weidong यांच्याविरुद्ध याचिका दाखल; कोरोना व्हायरस मुद्दाम पसरविल्याचा आरोप)
यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आयसोलेशन एरिया, रुग्णांना वेगळे ठेवण्यात आलेला परिसर यांसारख्या कस्तुरवा हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल अशा भागांमध्ये वाहन चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे. बीएमसीच्या अधिकाऱ्यांना या गोष्टीचे पालन होत आहे की नाही याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. अशा प्रकारचा कोणताही नियम मोडल्यास आयपीसी कलम 188 अंतर्गत शिक्षा होऊ शकते. दरम्यान, मुंबई (Mumbai) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) मंगळवारी प्रत्येकी एका व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळले. आता राज्यात संक्रमितांची संख्या 41 झाली आहे.