Unseasonal Rain In Maharashtra: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट; विदर्भात ऑरेंज तर मराठवाड्यात यलो अलर्ट जारी
पुढील 24 तास बर्याच भागात उन्हाचा पारा 40 अंशांवरच राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात सध्या कडक उन्हाळ्याच्या दिवसांत काही ठिकाणी अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज आहे. विदर्भात (Vidarbha) ऑरेंज अलर्ट, तर मराठवाड्यात (Marathwada) यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे काही ठिकाणी नागरिकांची उन्हाच्या कडाक्यातून सुटका होणार आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता आहे. काही मोजक्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदमगर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या भागात आज पावसाचा अंदाज असल्याने तेथे हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. मागील दोन दिवसात राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसला आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने तेथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अकोला मध्ये वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे. नागपूर, गोंदिया आणि यवतमाण मध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात यंदा मार्च- एप्रिल महिन्यापासून उन्हाचा कडाका अधिक तीव्र झाला आहे. पुढील 24 तास बर्याच भागात उन्हाचा पारा 40 अंशांवरच राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.