धक्कादायक! अल्पवयीन गर्भवतीच्या पोटावर लाथा-बुक्क्यांनी प्रहार; गर्भपात करण्यासाठी पती, सासू यांच्याकडून संतापजनक कृत्य
या प्रकरणी पती अक्षय धनाजी जाधव, सासू, सासरा, नणंद आणि पतीच्या आत्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भारत प्रगती पथावर चालला आहे असे कितीही म्हटले तरी, सत्य परिस्थिती काही बदलणार नाही. आजही स्त्रियांवरील अत्याचार, हुंडाबळी अशा घटना कॉमन झाल्या आहेत. नुकतेच पुणे जिल्ह्यातील वडगाव शिंदे येथे, पती आणि सासूने अल्पवयीन गर्भवतीच्या पोटावर लाथा मारून तिचा गर्भपात घडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पती अक्षय धनाजी जाधव, सासू, सासरा, नणंद आणि पतीच्या आत्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर पती आणि सासूला या प्रकरणात अटकही करण्यात आली आहे.
ही विवाहिता फक्त 17 वर्षांची आहे. हिच्या आई वडिलांवर जाधव कुटुंबियांच्या नातेवाईकांनी दबाव टाकून 2018 साली हे लग्न झाले होते. त्यानंतर अक्षयने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले तसेच तिला अनैसर्गिक कृत्य करण्यास दबाव आणायला सुरुवात केली. यासाठी मुलीने नकार दिला असता तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु केला. (हेही वाचा: गुजरात: लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्सला नकार दिल्याने नवऱ्याकडून बायकोला मारहाण)
या दरम्यान ती गर्भवती राहिली त्यामुळे तिने शारीरिक संबंधास नकार दिला. याच्या रागने अक्षयने तिला लाथा बुक्क्यांनी मारले. तसेच सासू, सासरे आणि नणंद यांनीही तिचा छळ करत तिला मारहाण केली. यामध्ये तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला व त्यामुळे तिला गर्भपात करावा लागला. त्यानंतर तिला माहेरी पाठवून, परत येण्यासाठी 25 लाख रुपये घेऊन येण्याची अट घातली. अखेर या मुलीने चिखली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.