ठाणे: लॉकडाऊनच्या काळात प्रवास करण्यासाठी E-Pass आवश्यक; http://epass.covidthane.org वर कसा कराल अर्ज?
डिजिटल ई-पास मिळवून तुम्ही प्रवास करु शकता. परंतु, हा ई-पास नेमका मिळवायचा कसा?
राज्यात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर पाहायला मिळत आहे. दिवसागणित कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. राज्यातील मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. त्यामुळे ठाणे शहर पुन्हा एकदा 10 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात केवळ अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. तसंच केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अत्यंत आवश्यक कामासाठी प्रवास करायचा असल्यास ई-पास (E-Pass) प्रणाली ठाणे महानगरपालिकेकडून विकसित करण्यात आली आहे. डिजिटल ई-पास मिळवून तुम्ही प्रवास करु शकता. परंतु, हा ई-पास नेमका मिळवायचा कसा? जाणून घेऊया...
डिजिठाणेच्या डिजिटल इ-परवाना प्रणालीस भेट देण्यासाठी http://epass.covidthane.org या लिंकवर जा. तसंच खाली दिलेला QR code स्कॅन करुन तुम्ही वेबसाईटला भेट देऊ शकता. त्या ठिकाणी तुमची आवश्यक माहिती भरा आणि सब्मिट करा. लिंक ओपन झाल्यावर तेथे प्रवासाचे कारण, पूर्ण नाव, फोटो, लिंग, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक, आधार नंबर, वाहन क्रमांक, प्रवासाची तारीख ही माहिती भरावी लागेल. तसंच कुठून कुठपर्यंत प्रवास करायचा आहे, याची माहिती देखील द्यावी लागेल. (महाराष्ट्रात 2 लाखाहुन अधिक कोरोनाबाधित; तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण जाणुन घ्या)
DigiThane Tweet:
ठाण्यात कोरोना व्हायरसचे 45833 रुग्ण असून त्यापैकी 17851 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1254 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या पाहता ठाणे महानगरपालिकेकडून नागरिकांच्या सोयीसाठी एक अॅप विकसित करण्यात आले आहे. ते अॅप अॅप हॉस्पिटलमधील बेडची उपलब्धता आणि अॅम्बुलन्स बुकींगसाठी उपयुक्त ठरेल. कालच पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या अॅपचे अनावरण करण्यात आले.