Maharashtra Honour Killing: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना; आंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या कुटुंबीयांकडून तरूणाचा खून

दरम्यान, मुलीचे वडील गीताराम किर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब किर्तीशाही अशी आरोपींची नावे आहेत.

Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Maharashtra Honour Killing: बालपणीच्या मैत्रिणीसोबत आंतरजातीय विवाह (Inter-Caste Marriage)केलेल्या एका तरूणाची मुलीच्या घरच्यांनी हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar)समोर आली आहे. अमित साळुंके असे हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. भर रस्त्यात त्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. दरम्यान, मुलीचे वडील गीताराम किर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब किर्तीशाही अशी आरोपींची नावे आहेत. (हेही वाचा: Rise in Missing Girls and Women in Maharashtra: महाराष्ट्रात बेपत्ता मुली, महिलांच्या संख्येत वाढ, मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, अमितचे त्याची बाल मैत्रीण असलेली विद्या हीच्या सोबत प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांची जात वेगळी असल्याने दोघांच्या नात्याला व लग्नाला घरच्यांचा विरोध होता. मात्र, दोघांनी घरच्यांचा विरोध झुगारून देऊन एप्रिल महिन्यात पळून जाऊन लग्न केले होते. विद्या ही बौद्ध समाजाची होती तर अमित गोंधळी समाजाचा होता. दरम्यान, अमितच्या कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला मान्यता दिली.

मे महिन्यात अमित आणि विद्या हिने लग्न केले. त्यानंतर विद्याचे वडील आणि चुलत भावाने त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यानंतर अमितच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. 14 जुलै रोजी अमितवर भर रस्त्यात चाकूने हल्ला करून त्याला भोसकले होते. या हल्ल्यानंतर अमितला घाटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

12 दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता. शुक्रवारी घाटी रुग्णालयात अमितचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपी वडील आणि भावाचा शोध घेत आहेत.