'होम मिनिस्टर' फेम आदेश बांदेकर आमदार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा
संख्याबळानुसार जागावाटपाचा विचार केला तर शिवसेनेला 5, राष्ट्रवादीला 4 व काँग्रेसला 3 जागा मिळू शकतात. मात्र, काँग्रेस 5 जागांसाठी आग्रही असल्याचे समजते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समसमान जागांसाठी आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे जागावाटप हा मुद्दाही तिन्ही पक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
Maharashtra MLC Election 2020: विधान परिषदेच्या रिक्त जागा भरण्यासाठी महाविकासआघाडी सरकारमधील घटक असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत. तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांची विधान परिषदेसाठी नावे निश्चित करणे हा या बैठकींचा प्रमुख विषय आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यत नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेकडून 'होम मिनिस्टर' फेम आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि राष्ट्रवादीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. ठाकरे आणि पवार यांच्यात या वेळी इतर नावांवरही चर्चा झाल्याचे समजते.
राजू शेट्टी यांच्या नावासाठी राष्ट्रवादी अनुकूल असल्याचे या आधीच स्पष्ट झाले आहे. आदेश बांदेकर यांच्या नावाबाबत शिवसेनेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. मात्र, दिव्य मराठी डॉट कॉम या संकेत स्थळाने दिलेल्या वृत्तात आदेश बांदेकर यांचे नाव निश्चित झाल्याचे म्हटले आहे. प्राप्त माहितीनुसार, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित असल्याचे समजते.
राजू शेट्टी
राजू शेट्टी यांच्याबाबत सांगायचे तर ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत. शेती, शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या समस्या विविध प्रश्न यांबाबत त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. प्रदीर्घ काळ लोकसभेत ते खासदारही राहिले आहेत. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी त्यांचा पराभव केला. मधला काही काळ वगळता त्यांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी चांगले संबंध राहिले आहेत. मधल्या काही काळात ते भाजपसोबत गेले होते. (हेही वाचा, महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2020: राज्यपाल कोट्यातील विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपलेले 12 आमदार; जाणून घ्या नावे)
आदेश बांदेकर
आदेश बांदेकर हे एक अभिनेते, निवेदक आहेत. एका खासगी दुरचित्रवाणी वाहिनीवरुन प्रसारीत होणारा त्यांचा 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम महाराष्ट्रात घराघरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमाने त्यांना महाराष्ट्राचे भाऊजी अशीही ओळख मिळवून दिली आहे. यासोबतच आदेश बांदेकर यांचे आणि ठाकरे कुटुंबीय पर्यायाने शिवसेनेशी घनिष्ठ संबंध आहेत. हे संबंध शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हायात असतानापासूनचे आहेत. शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यात ते सूत्रसंचालन करताना दिसतात. सध्या ते मुंबई येथील सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. या पदाला मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
दरम्यान, महाविकासआघाडी 12 सदस्यांसाठी कसे जागावाटप करते याबाबतही उत्सुकता आहे. संख्याबळानुसार जागावाटपाचा विचार केला तर शिवसेनेला 5, राष्ट्रवादीला 4 व काँग्रेसला 3 जागा मिळू शकतात. मात्र, काँग्रेस 5 जागांसाठी आग्रही असल्याचे समजते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समसमान जागांसाठी आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे जागावाटप हा मुद्दाही तिन्ही पक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.