Holi 2023 Preventive Order: सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द व गाण्यांचा वापर केल्यास होऊ शकते कारवाई; मुंबई पोलिसांनी जारी केले यंदाच्या होळीसाठी प्रतिबंधात्मक आदेश
जो कोणी आदेशाचे उल्लंघन करेल किंवा त्याचे उल्लंघन करण्यास मदत करेल त्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 नुसार शिक्षा होईल.
होळीचा (Holi 2023) सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रात यंदा 6 मार्चला होळीचा सण साजरा होईल, तर 12 मार्च रोजी रंगपंचमी साजरी होईल. मुंबईकरांना या रंगांच्या सणाचा आनंद लुटता यावा यासाठी मुंबई पोलिसांनी सोमवारी प्रतिबंधात्मक आदेश (Holi Preventive Order) जारी केले आहेत. होळी-रंगपंचमी सारख्या सणांवेळी अनेक अपघात होण्याची शक्यता असते, तसेच काही वेळा जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यताही नाकारली जाऊ शकत नाही. यंदा हे सण आनंदाने साजरे व्हावेत म्हणून पोलिसांनी ही नियमावली जाहीर केली आहे.
विशाल ठाकूर, उप. पोलीस आयुक्त (ऑपरेशन्स), बृहन मुंबई यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी काही कृत्यांवर प्रतिबंध करणे आवश्यक मानले जात आहे.
जाणून घ्या होळी साजरी करताना प्रतिबंधित कृत्यांची यादी-
सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द किंवा घोषणा देण्यावर बंदी, सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी वाजवण्यास बंदी.
रात्री 10 वाजण्यापूर्वी होलिका दहन करणे आवश्यक आहे.
कोणाचीही प्रतिष्ठा किंवा नैतिकता दुखावली जाईल अशी चिन्हे, प्रतिमा, फलक यांचे प्रदर्शन किंवा ते प्रसारित करण्यावर बंदी.
लाऊडस्पीकरचा आवाज वाढविण्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फेकण्यावर बंदी.
रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे आणि/किंवा ते फेकण्यावर बंदी. (हेही वाचा: Konkan Holi Special Train 2023: कोकणवासीयांसाठी खुषखबर; होळीसाठी कोकण रेल्वेची स्पेशल ट्रेन)
जो कोणी आदेशाचे उल्लंघन करेल किंवा त्याचे उल्लंघन करण्यास मदत करेल त्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 नुसार शिक्षा होईल. दरम्यान, होलिका दहन दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला केले जाते आणि धूलिवंदन हा उत्सव फाल्गुन महिन्याच्या कृष्ण प्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी रंग गुलालाने साजरा केला जातो. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये होळीच्या पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते.