Hit-and-Run in Nagpur: हिट अँड रन प्रकरणाची नागपूर शहरात पुनरावृत्ती; दोन ठार, पाच जखमी; भरधाव कारने 8 मजूरांना चिरडले, चालकास अटक
शहरातील वाठोडा पोलिस ठाणे हद्दीतील दिघोरी चौकात रविवारी (16 जून) मध्यरात्री ही घटना घडली. ज्यामध्ये दोघे ठार तर पाच जण जखमी झाले आहेत.
Nagpur News: हिट-अँड-रन प्रकारातील आणखी एका घटनेने नागपूर (Hit-and-Run in Nagpur) शहर हादरुन गेले आहे. शहरातील वाठोडा पोलिस ठाणे हद्दीतील दिघोरी चौकात रविवारी (16 जून) मध्यरात्री ही घटना घडली. ज्यामध्ये दोघे ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. मद्यधुंद चालकाने बेदरकारपणे वाहन (कार) हाकत फुटपाथवर झोपलेल्या आठ मजुरांना चिरडल्याने ही घटना घडली. नागपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, कारचालक अल्पवयीन असून घटना घडली तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. तपासामध्ये अधिक तपशील पुढे येण्याची शक्यता आहे.
घटनेचा तपशील
रस्त्यावर खेळणी विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या महिला आणि लहान मुलांसह अनेक लोक फूटपाथवर झोपले होते. दिवसभराच्या कामाने दमूनभागून रात्रीच्या अंधारात निद्राधीन झालेले हे जीव निसर्गाच्या कुशीत विश्रांती घेत होते. दरम्यान, मद्यधुंद चालक आपल्या भरधाव कारसह लगतच्या रस्त्यावरुन जात असताना त्याने मध्यरात्री 12.15 च्या सुमारास या सर्वांना चिरडले आणि हा अपघात झाला. भूषण लांजेवार असे या हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. त्याने चालविलेल्या भरधाव कारचे नियंत्रण सुटले आणि त्याची कार तीन महिला, चार मुले आणि एक पुरुष यांच्या अंगावरुन धावत ती फूटपाथवर जाऊन आदळली. ही धडक इतकी तीव्र होती की, घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते. ज्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा, Pune Hit And Run Accident: पुणे जिल्ह्यात पुन्हा 'हिट अँड रन'; पिंपरी चिंचवड परिसरातील हिंजवडी येथे भरधाव कारने तरुणीला चिरडले (Watch Video))
आपत्कालीन प्रतिसाद आणि अटक
अपघाताची माहिती मिळताच वाठोडा पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून तातडीने शोधमोहीम सुरू केली आणि दारूच्या नशेत सापडलेल्या भूषण लांजेवारला अटक केली. (हेही वाचा, Andhra Pradesh Accident: ओव्हरटेक करताना अपघात, 6 ठार; आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील घटना (Watch Video))
तपास आणि जखमींची स्थिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाठोडा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विजय दिघे यांनी जखमींची प्रकृती आणि पीडितांसाठी सुरू असलेली वैद्यकीय सेवा याची पुष्टी केली. तसेच, घटनेचा तपास अद्यापही सुरु असल्याचे सांगितले.
दरम्यान, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. शिवाय हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने सामाजिक पातळीवरही चिंता उपस्थित होत आहे. दरम्यान, मद्यधुंद चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.