Hinjawadi PMRDA Development: PMRDA कडून भूसंपादनाला वेग; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात, हिंजवडीचा चेहरा बदलणार
हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या ६ प्रमुख पर्यायी रस्ते प्रकल्पांचे प्रत्यक्ष बांधकाम १ डिसेंबरपासून सुरू करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून, १५ ऑक्टोबरपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
राजीव गांधी इन्फोटेक पार्क (हिंजवडी) आणि लगतच्या भागातील दैनंदिन वाहतूक कोंडीतून आयटी कर्मचारी व स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रहदारी सुरळीत करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या ६ प्रमुख रस्ते प्रकल्पांचे प्रत्यक्ष बांधकाम १ डिसेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन, रस्त्यांची अंतिम आखणी आणि निविदा प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला आमदार शंकर मांडेकर, पीएमआरडीएचे (PMRDA) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
१५ ऑक्टोबरपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे लक्ष्य
रस्ते प्रकल्पांच्या कामाला अनावश्यक विलंब टाळण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने राबवली जाणार आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत ६० ते ७० टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
माण, मारुंजी आणि हिंजवडी भागातील शेतकरी व जमीनमालकांशी थेट संवाद साधण्यासाठी गावनिहाय विशेष मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातील. या शिबिरांमध्ये जमीनमालकांना हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर), मोबदला धोरण, दोन किलोमीटर परिसरातील निवासी वापराचे नियम आणि मिळणाऱ्या इतर लाभांची सविस्तर माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल.
पर्यायी रस्त्यांची चाचपणी आणि कालवा जमिनीचा वापर
निश्चित केलेल्या ६ प्रमुख रस्त्यांव्यतिरिक्त स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार आणखी दोन पर्यायी मार्गांची शक्यता तपासली जात आहे. विप्रो चौक, पुनवळे-मारुंजी जोड रस्ता तसेच जलसंपदा विभागाच्या कालव्यालगत असलेल्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.
कालव्यालगतच्या किंवा सिंचन विभागाच्या ताब्यातील जमिनीचा रस्ते विकासासाठी वापर करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव ३० सप्टेंबरपर्यंत तयार करून कालवा मंडळाकडे पाठवला जाईल. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या जमिनीच्या वापराची आवश्यक मंजुरी मिळवून पुढील कार्यवाही सुरू करण्याचे नियोजन आहे.
भूमकर चौक आणि रावेतमधील कोंडीवर तात्काळ उपाय
दीर्घकालीन प्रकल्पांसोबतच हिंजवडीला जोडणाऱ्या मुख्य चौकांमधील दैनंदिन अडथळे दूर करण्यावरही भर देण्यात आला आहे. भूमकर चौक आणि रावेतसह गर्दीच्या ठिकाणी रस्ते रुंदीकरण, खड्डे बुजविणे आणि डांबरीकरणाची कामे प्राधान्याने केली जातील. तसेच वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून हलक्या वाहनांसाठी अंतर्गत मार्ग उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.