Hindu Jan Aakrosh Rally: नवी मुंबईच्या वाशी येथे 26 फेब्रुवारीला हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन; रॅलीची होणार व्हिडिओग्राफी
नुकतेच, सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेला हे सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले की, मोर्चावेळी द्वेषयुक्त भाषण होणार नाही याची खात्री करूनच आयोजकांना, सकल हिंदू समाजाची रॅली आयोजन करण्याची परवानगी दिली जाईल.
नवी मुंबईच्या (Navi Mumbai) वाशी (Vashi) येथे 26 फेब्रुवारीला ‘गोहत्या, ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरणाविरोधात हिंदू जन आक्रोश रॅलीचे (Hindu Jan Aakrosh Rally) आयोजन करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार वाशी येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या या रॅलीची व्हिडिओग्राफी करण्यात येणार आहे. याआधी 29 जानेवारी रोजी मुंबईत अशाच प्रकारची रॅली काढण्यात आली होती आणि त्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.
नवी मुंबईतील विश्व हिंदू परिषदेचे प्रतिनिधी शशिकांत यादव म्हणाले, सकल हिंदू समाजाच्या छत्राखाली, सर्व हिंदू संघटना 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता कोपरी वाशीतील ब्लू डायमंड चौकात एकत्र येतील आणि सेक्टर 17 मधील शिवाजी चौकाकडे मोर्चा काढतील.
दुसरीकडे, महात्मा गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून 26 नोव्हेंबर रोजी प्रस्तावित सकल हिंदू समाजाच्या मोर्चावर कारवाई करण्याची मागणी केली होती. नवी दिल्ली येथे झालेल्या रॅलीत केलेल्या द्वेषपूर्ण भाषणांविरोधात तुषार यांनी सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच याचिका दाखल केली आहे. गांधी यांच्या पत्रानंतर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मोर्चाच्या व्हिडिओ शूटिंगचा निर्णय जाहीर केला आहे. (हेही वाचा: ईडी आणि सीबीआयचा वापर करून विरोधी पक्षांना त्रास दिला जात आहे, पवन खेडा यांच्या अटकेवर संजय राऊतांचे वक्तव्य)
गांधी यांनी भारंबे यांना पत्र लिहून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या मोर्चांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याची विनंती केली आहे. नुकतेच, सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेला हे सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले की, मोर्चावेळी द्वेषयुक्त भाषण होणार नाही याची खात्री करूनच आयोजकांना, सकल हिंदू समाजाची रॅली आयोजन करण्याची परवानगी दिली जाईल. तसेच कार्यक्रमाची व्हिडिओग्राफी आणि व्हिडीओ कोर्टात उपलब्ध करून देण्याचेही निर्देश दिले आहेत.