अजित पवार यांचं पुढे काय होणार? पाहा त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया
अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी साधलेल्या जवळीकीमुळे, ते राष्ट्रवादीत राहणार का? त्यांना महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळणार का?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी शनिवारी सकाळी काकांची साथ सोडत देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु, मंगळवारी दुपारी मात्र त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि संपूर्ण महाराष्ट्राला व भाजपला आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर ते काल रात्री सिल्वर ओकवर शरद पवार यांच्या भेटीलाही गेले. परंतु अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी साधलेल्या जवळीकीमुळे, ते राष्ट्रवादीत राहणार का? त्यांना महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळणार का? आणि शरद पवार यांच्याशी त्यांचे या पुढे संबंध कसे असणार? असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत.
या सर्व प्रश्नांचं उत्तर दिलं आहे खुद्द अजित पवार यांनी. माध्यमांशी बोलताना, त्यांनी कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलाच नव्हता असा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, "मी बंड केलंच नव्हतं. माझी राष्ट्रवादी काँग्रेसने हकालपट्टी केली नव्हती. मी तेव्हाही राष्ट्रवादीत होतो आणि आताही राष्ट्रवादीतच आहे."
तसेच ते म्हणाले, "मी कालही नाराज नव्हतो, आजही नाही आणि उद्याही नसेन. बाकी मंत्रीपदाबाबत काय निर्णय घ्यायचा तो पक्ष घेईल. पक्षांचा निर्णय मला मान्य आहे." अजित पवार यांनी शपथविधीनंतर ही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Government Formation: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री कोण?
दरम्यान काल महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीआधी ट्रायडंट हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते 'एकच वादा, अजित दादा' असे पोस्टर घेऊन अजित पवार यांचा नावाचे जयघोष करत होते.