Hemant Nagrale | (Photo Credit- Facebook)

महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून मनसुख हिरेन मृत्यू आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली बॅग सापडणं या दोन घटनांमुळे अनेक उलट सुलट चर्चा सुरू आहे. यामध्ये एपीआय सचिन वाझे यांचं निलंबन आणि NIA कडून अटक झाल्यानंतर मुंबईच्या पोलिस आयुक्तांच्या (Commissioner of Mumbai Police) बदलीसह 4 महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. दरम्यान परमबीर सिंह (Param Bir Singh) यांची उचलबांगडी करत त्यांच्याजागी हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची नियुक्ती होत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आज दिली आहे. अनिल देशमुख यांच्या ट्वीटनुसार, हेमंत नगराळे आता नवे मुंबई पोलीस आयुक्त, रजनीश शेठ (Rajnish Sheth) पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार, संजय पांडे (Sanjay Pandey) महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी तर परमबीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांची जानेवारी 2021 महिन्यातच महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदी नेमणूक झाली होती पण आता ते मुंबईचे आयुक्तपद सांभाळतील. हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांनी यापूर्वी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त पद भूषवलं आहे. त्यावेळेस मार्च 2018 मध्ये विधानपरिषदेची परवानगी न घेताच शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणं नगराळेंना भोवलं होतं. त्यावरून निलंबनाची देखील कारवाई झाली होती. तर याच कारकीर्दीमध्ये वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात करणं, 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात कायदा-व्यवस्था उत्तम ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप देखील मिळाली होती. (हेही वाचा, Sanjay Raut यांचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल; महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणा पाठवून महाविकास आघाडी सरकार आणि Mumbai Police यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न.)

अनिल देशमुख ट्वीट

महाराष्ट्रात सध्या मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीस करत आहे तर मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीचा तपास एनआयए ही केंद्रीय तपास यंत्रणा करत आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारवर याप्रकरणामुळे अनेक अडचणी आल्या आहेत. यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही हे प्रकरण भोवणार अशी चर्चा आहे. पण महाविकासआघाडीकडून तपासाअंती जे सदोष आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल असे सांगण्यात आले आहे.