संजय राठोड यांच्या जागी मला मंत्री करा; हरिभाऊ राठोड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
हरिभाऊ राठोड यांनी "संजय राठोड यांच्या ठिकाणी आता मला वनमंत्री करा अशा आशयाची दोन पत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लिहिली आहेत.
वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव पूजा चव्हाण प्रकरणात समोर आल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्या रिक्त पदावर मला वनमंत्री करा अशी मागणी शिवसेना आमदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. वनमंत्री पदासाठी शिवसेनेत जोरदार स्पर्धा सुरु झाली असून या पदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान हरिभाऊ राठोड यांनी "संजय राठोड यांच्या ठिकाणी आता मला वनमंत्री करा अशा आशयाची दोन पत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लिहिली आहेत.
ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, हरिभाऊ राठोड यांनी 7 मार्चला आणि 11 मार्चला अशी दोन पत्रं मुख्यमंत्र्यांना लिहली आहेत. बंजारा समाजाची सेनेला गरज आहे, मी आपली आमदारकी तुम्हाला मुख्यमंत्री बनवायला धोक्यात आणली असून मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रीपद मिळालं असतं असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.हेदेखील वाचा- संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर; वनमंत्रीपदासाठी 'ही' नावे चर्चेत
हरिभाऊ राठोड काय म्हणाले पत्रात?
आपण विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेच्या आमदारांना निवडून आणण्यासाठी काम केल्याचं सांगून आपला संपर्क आणि काम प्रत्येक जिल्ह्यात असल्याचा उल्लेख हरिभाऊ राठोड यांनी केलाय. आपण भटक्या विमुक्त जाती, बारा बलुतेदार आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व केल्यासं सांगत हरिभाऊंनी आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली तर त्याचा फायदा शिवसेनेला संपूर्ण राज्यात होईल असं सांगितलंय. आपण शिवसेनेमध्ये बिनशर्त प्रवेश केल्याचं सांगत सत्तेत आल्यास खारीचा वाटा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याची आठवणही हरिभाऊ राठोड यांनी करुन दिली आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण मोठा त्याग केला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
28 फेब्रुवारी रोजी संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला होता. दरम्यान, तीन दिवसानंतर राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर 4 मार्चला राज्यपालांकडे गेला आणि अखेर संजय राठोड यांच्या राजीनाम्याला मंजूरी मिळाली.