कोकणचा राजा हापूस आंब्यांवर भौगोलिक मानांकनाची मोहर

केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

हापूस आंबा photo credits PTI File Photo

जशी महाबळेश्वराची स्ट्रॉबेरी, दार्जिलिंगची चहा तसाच आता कोकणचा राजा 'हापूस आंबा' यावर भौगोलिक मानांकनाची (GI) मोहर उमटवण्यात यश आलं आहे. नुकतीच केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने याबाबत घोषणा केली आहे. आता केवळ रत्नागिरी, सिंधुर्दुग व लगतच्या परिसरातील हापूस आंबे ' हापूस' आंबा' असा उल्लेख करून विक्री करू शकणार आहेत.

भौगोलिक मानांकनामुळे जागतिक बाजारपेठेत हापूस आंब्यांना खास ओळख मिळाली आहे. कोकण वगळता इ तर भागातूनही आंबा 'हापूस'च्या नावावर विकला जात असे. मात्र आता ग्राहकांची फसवणूक होण्याचं प्रमाणही या मानांकनामुळे कमी होणार आहे. यापूर्वी परदेशात पाठवला जाणारा आंबा हा भारतीय आंबा या नावाने पाठवला जात असे. आता ' हापूस आंबा' या नावाने निर्यात होणार आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले होते. आता आंबा उत्पादकांना या मानांकनामुळे योग्य उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. यासोबतच   'हापूस आंब्याच्या' नावाखाली  इतर आंबे विकणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई कारणंही सुकर होणार आहे.