Gram Panchayat Elections 2023: महाराष्ट्रात 2369 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान, सरपंच पदासाठी 130 ठिकाणी पोटनिवडणूक

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तब्बल 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

Grampanchayat (File Image)

Gram Panchayat Elections in Maharashtra: महाराष्ट्रात प्रदीर्घ काळानंतर गावगाड्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तब्बल 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या ग्रामपंचायतींमधील 2 हजार 950 सदस्यांसाठी ही निवडणूक पार पडते आहे. यासोबतच रिक्त असलेल्या सरपंच पदासासाठी 130 गावांमध्ये पोटनिवडणुकाही आज म्हणजेच 5 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडत आहेत. ग्रामपंचायत निवडणुका पक्षनिरपेक्ष असते. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये नेमका कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून आले हे कळणे तसे कठीण, असते तरीही राजकीय पक्ष दावे प्रतिदावे करत असतात.

सकाळी 7.30 वाजलेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. जी सायंकाळी 5.30 पर्यंत सुरु असेल. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागांमध्ये मात्र सकाळी 7.30 ते दुपारी 3 या कालावधीतच मतदान पार पडेल. मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 6 नोव्हेंबरला होणार आहे. नक्षलवादी परिसरात मात्र ही मतमोजणी 7 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडेल.

राजकीय नेत्यांच्या गावातही ग्रामपंचायत निवडणूक पार पडत असल्याने सर्वांचे लक्ष या गावांकडे लागले आहे. अजित पवार यांच्या काटेवाडी गावात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. अजित पवार मात्र, या वेळी मतदानाला जाणार नसल्याचे समजते. डेंग्यू झाल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे ते सध्या विश्रांती घेत आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुसऱ्या बाजूला आमदार दिलीप मोहिते (अजित पवार गट) खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव गावात, मंत्री गुलाबराव पाटील पाळधी खुर्द गावात मतदान करतील तर सांगोला येथील महूद गावात शहाजी बापू पाटील (शिंदे गटाचे आमदार) मतदान करणार आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानंतर महत्त्वाच्या शहरांमधील महापालिका, नगरपरीषदांच्या निवडणुका पार पडणे अपक्षीत असते. मात्र काही कारणाने या निवडणुका रखडल्या आहेत. परिणामी ग्रामपंचायती निवडणुकांना महत्व आले आहे. जनतेचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो आहे हे या महापालिका निवडणुकांमधून पुढे येत असते. मात्र, या वेळी ती संधीच नसल्याने ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाकडे राजकीय पक्षांचे अधिक लक्ष असणार आहे. एक डेटा सँपल म्हणूनही या निवडणुकांकडे पाहिले जाते. राज्यातील बदललेली स्थिती पाहता राजकीय पक्षांच्या अनेक तगड्या नेत्यांनी आणि आमदार, खासदारांनी या निवडणुकीसाठी ताकद लावली आहे.