'लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांसारख्या भारतरत्नांची प्रतिष्ठा सरकारने 'अशा' गोष्टींसाठी पणाला लावू नये'- राज ठाकरे
लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही खूप मोठी लोके आहेत. या लोकांना अशा प्रकारचे ट्विट करायला सांगणे, एकाच हॅशटॅगवर सगळ्या लोकांची ट्विट येणे, ही खूपच मोठी माणसे आहेत. त्यांना सरकारने अशा गोष्टींमध्ये पडायला लावू नये
शेतकऱ्यांचे कृषी कायद्यांविरुद्ध चालू असलेल्या आंदोलनाचे (Farmers Protest) पडसाद सध्या देशभर उमटले आहेत. या आंदोलनाला तब्बल 70 दिवस उलटून गेले आहेत व अजूनही सरकार आणि शेतकरी यांची चर्चा फळाला लागली नाही. अशात या आंदोलनाचा विषय आंतरराष्ट्रीय माध्यमांनी उचलून धरला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय सेलेब्जनी यावर प्रतिक्रिया देत आंदोलनाला पाठींबा दर्शविला आहे. आता त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय सेलेब्ज एकवटले आहे. नुकतेच लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, अजय देवगण अशा भारतीय सेलेब्जनी सोशल मिडियावर सरकारला पाठींबा दर्शवला. त्यावर आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांची प्रतिष्ठा सरकारने अशा गोष्टींसाठी पणाला लावू नये’, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
शेतकरी आंदोलनाचा प्रश्न हा भारताचा आहे त्यावर बोलायचं अधिकार फक्त भारतीयांनाच आहे, असे अनेक सेलेब्जनी म्हटले होते. यासाठी त्यांनी #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या हॅशटॅग्सचा वापर केला होता.
आज माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘सरकारने या गोष्टी करायला नाही पाहिजेत. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही खूप मोठी लोके आहेत. या लोकांना अशा प्रकारचे ट्विट करायला सांगणे, एकाच हॅशटॅगवर सगळ्या लोकांची ट्विट येणे, ही खूपच मोठी माणसे आहेत. त्यांना सरकारने अशा गोष्टींमध्ये पडायला लावू नये. हा सरकारच्या धोरणाचा विषय आहे. हा काही देशाचा विषय नाही. काही चीनमधून संकट आले आहे, पाकिस्तानमधून आले आहे. शेतकऱ्यांचे संकट आहेच मोठे, पण या सर्व गोष्टींसाठी सर्व लोकांना… त्या अक्षय कुमारवरती आटपायचा ना विषय. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही भारतरत्ने आहेत. खूप मोठी माणसे आहेत. त्यांना अशा गोष्टी करायला सांगणे... आणि ती साधी माणसे आहेत. सरकारने त्यांना सांगितले, त्यांनी ट्विट केले, पण आज जे ट्रोल होत आहे ते आज त्यांच्यावरच येत आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘ती रिहाना कोण बाई आहे, मला काही कळाले नाही. कोणतरी कुठेतरी बोलते आणि त्यावर सरकार उत्तर देते तिला. मला सांगा ती ट्वीट करण्यापूर्वी तुम्हाला तरी माहिती होती का? जिच्या एका ट्वीटने तुम्ही सगळेजण तिला काहीतरी बोलताय आणि इतर सगळे म्हणतायत की आमच्या देशाचा प्रश्न आहे, आम्ही सोडवू, तु नाक खुपसायची गरज नाही. पण मग अगली बार ट्रम्प सरकार असे जाऊनही भाषणे करायची गरज नव्हती. तो त्यांच्या देशाचा प्रश्न होता.’ (हेही वाचा: 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार शेतकरी आंदोलन; राकेश टिकैत यांनी सरकारला दिला अल्टीमेटम)
दरम्यान, नुकतेच शेतकरी आंदोलनाबद्दल पॉपस्टार रिहानाने ट्विट करत, ‘आपण याबद्दल का बोलत नाही आहोत?’ असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस यांच्यासह अनेकांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. त्यानंतर अशा सेलेब्जविरुद्ध भारतीय सेलेब्ज उभे राहिले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)