Buldhana Bus Accident: समृद्धी द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकार काहीच करत नाही, शासनाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडली; संजय राऊत यांची बुलढाणा बस अपघातावर प्रतिक्रिया
राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, समृद्धी महामार्गावरील आजची दुर्घटना अत्यंत निराशाजनक आहे. या रस्त्यावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत, मात्र शासन याकडे लक्ष देत नसल्याचे त्यांनी सांगितले.
Buldhana Bus Accident: बुलढाणा येथे शुक्रवारी रात्री उशिरा बसचा भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 25 नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे राजकीय वर्तुळातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात येत आहे. बस अपघातावरून राजकीय पारा चांगलाच तापला आहे. उद्धव ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis government) आरोप केले आहेत. समृद्धी द्रुतगती मार्गावरील (Samruddhi Mahamarg) अपघात रोखण्यासाठी सरकार काहीच करत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.
शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महाराष्ट्रातील बुलढाणा येथील बस दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, बुलढाण्यातील अपघाताने सरकारचे डोळे उघडले पाहिजे. कारण हा एक्स्प्रेस वे सुरू झाल्यापासून आतापर्यंत 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. (हेही वाचा -Buldhana Bus Accident: टायर फुटल्यानंतर बसमधील ज्वलनशील वस्तूंमुळे लागली आग; अपघातग्रस्त बस मालकाची प्रतिक्रिया)
संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा -
उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या अपघातानंतर प्रतिक्रिया देताना भाजपला नाटकी म्हटले आहे. राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, समृद्धी महामार्गावरील आजची दुर्घटना अत्यंत निराशाजनक आहे. या रस्त्यावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत, मात्र शासन याकडे लक्ष देत नसल्याचे त्यांनी सांगितले.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात नियमित निवडणुका व्हाव्यात, अशी आमची मागणी आहे. पण भाजपला त्याची भीती वाटते. युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात यूसीसीवर राऊत म्हणाले की यूसीसीचा मसुदा अद्याप आलेला नाही. मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही त्यावर विचार करू. बुलढाण्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावात समृद्धी एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास एका प्रवासी बसला आग लागली, त्यात एकूण 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीत 33 जण होते, त्यापैकी आठ जण सुरक्षित आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 520 किमी लांबीच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. या द्रुतगती महामार्गाचे अधिकृत नाव 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' असे आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे.