औरंगाबाद: मराठवाड्याच्या नागरिकांसाठी खूषखबर; जायकवाडी धरण 100% भरलं
यामुळे मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा, बीड, नाशिक, परभणी, नांदेड या भागातील नागरिकांना फायदा होणार आहे.
मुंबई, कोकणसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये यंदा दिलासादायक पाऊस पडला आहे. मुंबई, पुण्याला पाणीपुरवठा करणारी अनेक तलावं, धरणं भरभरून वाहत असताना मराठवाड्यासाठीदेखील एक मोठी दिलासादायक बाब पुढे आली आहे. आशियातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख असणारं जायकवाडी धरण आता पूर्ण भरलं आहे. जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असून औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण आहे. मराठवाड्यातील सुमारे 2.40 लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे.
सध्या जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून 700 क्युसेस तर डाव्या कालव्यातून 400 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने धरण आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी भरल्याने निम्म्या मराठवाड्याच्या तहान भागली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा, बीड, नाशिक, परभणी, नांदेड या भागातील नागरिकांना फायदा होणार आहे. मुंबईकरांसाठी खुशखबर! तुळशी, तानसा नंतर आता मोडकसागर धरणही ओव्हरफ्लो.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात दमदार पाऊस पडल्याने तेथील धरणांतून सोडलेले पाणी आता जायकवाडी धरणात दाखल होत आहे. गेल्या पाच दिवसांत जायकवाडीच्या पाणीसाठ्यात दहा टक्क्याने वाढ झाली. पावसाचा जोर कायम राहिल्याने 12-20 हजार क्यूसेक दरम्यान पाणी जमा झाले. हा पाण्याचा जोर कायम राहिल्याने आता जायकवाडी धरण पूर्णपणे भरले आहे.