Gold Seized At Mumbai Airport: मुंबई विमानतळावर ₹ 2.58 कोटींचे सोने जप्त, चौघांना अटक
महसूल गुप्तचर संचालनालय (DRI), मुंबई विभागीय युनिटने मंगळवारी जेद्दाहून येणाऱ्या दोन प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) , मुंबई येथे रोखले.
महसूल गुप्तचर संचालनालय (DRI), मुंबई विभागीय युनिटने मंगळवारी जेद्दाहून येणाऱ्या दोन प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) , मुंबई येथे रोखले. त्यांच्याकडे केलेली चौकशी आणि घेतलेल्या झडतीमध्ये त्यांच्याकडे तब्बल 4 किलो सोने आढळून आले. ज्याची किंमत ₹2.58 कोटी आहे. हे सोने तस्करीचे (Gold Smuggling) असून तस्करांनी तस्करीसाठी आता वेगळाच फंडा अवलंबत असल्याचे पुढे आले आहे.
मिक्सर ग्राइंडरच्या माध्यमातूनही तस्करी
डीआरआयच्या अधिकृत निवेदनानुसार, अधिकाऱ्यांनी प्रवाशांची कसून झडती घेतली. या झडतीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आतील कपड्यांमध्ये तब्बल 1 किलो सोन्याची माती आढळून आली. याव्यतिरिक्त, सामानाच्या तपासणीत तीन मिक्सर ग्राइंडर प्रवाशांकडून वाहून नेले जात असल्याचे आढळून आले. हे मिक्सर खूपच जड होते. त्यामुळे त्यांची जवळून तपासणी केल्यावर, अधिकाऱ्यांना मिक्सर ग्राइंडरमध्ये लपवून ठेवलेले अंदाजे 2 किलो सोन्याचे तुकडे सापडले. (हेही वाचा, Gold Smuggling: फुटवेअरच्या इनसोलमध्ये लपवून 514 ग्रॅम सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न; हैदराबाद कस्टम्सने महिलेला पकडले)
बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी कारवाई
सोने आणि कोणत्याही प्रकारच्या तस्करीस महसूल विभागाच विरोध असतो. म्हणूनच विमानतळांवर अत्यंत कसून तपासणी केली जाते. या प्रकरणातही तस्करीचे चार किलो सोने जप्त करण्याची कारवाई ही सदर संस्थेची सतर्कता आणि बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. तस्करांनी वापरलेल्या मोडस ऑपरेंडीमध्ये सोने अत्यंत वेगळ्या प्रकारे लपविण्याच्या पद्धतींचा समावेश होता. (हेही वाचा, Mumbai News: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी, मुख्य आरोपी अटकेत, साडेचार कोटी रुपयांचं सोनं जप्त)
चौघांना अटक
पुढील तपासात असे आढळून आले की, विमानतळाबाहेरील दोन व्यक्ती हे तस्करीचे सोने मिळवणारे होते. तत्परतेने कारवाई करून, डीआरआय अधिकार्यांनी सापळा रचून त्या दोन व्यक्तींनाही अटक केली. या दोन्ही व्यक्तींचाही गुन्ह्यामध्ये समावेश असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. त्यामुळे दोन प्रवासी आणि विमानतळाबाहेर सोने घेण्यासाठी थांबलेले दोघे अशा चौघांनाही सीमाशुल्क कायदा 1962 च्या संबंधित तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. ही कारवाईत सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या संघटित सिंडिकेट्सचा नायनाट करण्याच्या DRI च्या मोहीमेचा भाग म्हणून करण्यात आली.
महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) ही एक भारतीय कस्टम एजन्सी आहे. जी तस्करी विरोधी कायदे लागू करते. DRI केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचा (CBIC) भाग आहे, जो वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत आहे. 1962 च्या सीमाशुल्क कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करणे हे डीआरआयचे प्राथमिक कर्तव्य आहे. तस्करीच्या कृतींची माहिती गोळा करणे आणि त्यांचा अभ्यास करणे, तस्करीविरोधी संसाधने तैनात करणे, तस्करी रोखण्यासाठी आवश्यक बुद्धिमत्तेसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, यांसारख्या जबाबदाऱ्या या संस्थेला पार पाडाव्या लागतात.