Bjp Mla Prasad Lad: भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सापडल्या सोने-चांदी, देवांच्या मूर्ती; पैशांनी भरलेल्या बॅगचाही समावेश
या बॅगमध्ये सोने-चांदीच्या मूर्ती ( Gold-Silver Idols) आणि पैसे असा ऐवज सापडला आहे. ही बॅग लाड यांच्या घरासमोर कशी आली याबाबत पोलीस तपास करत आहेत.
भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांच्या माटुंगा येथील घरासमोर एक बॅग सापडली आहे. या बॅगमध्ये सोने-चांदीच्या मूर्ती ( Gold-Silver Idols) आणि पैसे असा ऐवज सापडला आहे. ही बॅग लाड यांच्या घरासमोर कशी आली याबाबत पोलीस तपास करत आहेत. एखादा अज्ञात व्यक्ती लाड यांच्या घरासमोर बॅग सोडून गेल्याचा पोलिसांना संशय आहे. ही बॅग प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या घरासमोर कोणी व का ठेवली असावी याबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
घरासमोर बॅग सापडल्याचे कळताच प्रसाद लाड यांनी तातडीने पोलिसांना फोन केला त्यानंतर पोलिसंचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बॅग ताब्यात घेऊन तिची तपासणी केली. पोलिसांना सुरुवातीला वेगळा संशय होता. त्यामुळे त्यांनी घातपाताच्या दृष्टीकोनातून बॅगची तपासणी सुरु केली. मात्र, त्यांनी बॅग जेव्हा उघडून पाहिली तेव्हा त्यात सोने, चांदी, पैसे आणि देवाच्या मूर्ती असा ऐवज सापडला. पोलिसांनी पंचनामा केला आणि बॅग ताब्यात घेतली. (हेही वाचा, Prasad Lad: भाजप नेते प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना पत्र लिहून केली तक्रार)
प्रसाद लाड यांच्याच घराबाहेर सोने, चांदी आणि पैशांची बॅग का ठेवण्यात आली असावी? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. प्रसाद लाड यांनी सांगितले की, त्यांना आज सकाळी त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा फोन आला. त्याने सांगितले की, त्यांच्या घराबाहेर एक बॅग दिसत आहे. त्यानंतर प्रसाद लाड यांनी पोलिसांना फोन करुन या बॅगबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन बॅगची तपासणी केील. या वेळी पोलिसांना बॅगेत सोने, चांदी, पैसे आणि देवाच्या मूर्ती असा ऐवज आढळून आला.
प्रसाद लाड यांनी म्हटले आहे की, कोणा अज्ञात व्यक्तीने ही बॅग ठेवली आहे. नेमकी माझ्याच घरासमोर ही बॅक का ठेवण्यात आली असावी. आज आषाढी एकादशी आहे. अशा दिवशी असा प्रकार घडल्याने माझ्याही मनात संभ्रम निर्माण झाला आहे तर कुटुंबीयी काहीसे घाबरले आहेत. पोलीस या प्रकाराचे मूळ शोधून काढतील. त्यांनी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास करावा, असेही प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.