मुंबई: लोकमान्य टिळक टर्मिनस येथील शालिमार एक्स्प्रेस मध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने खळबळ

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथील शालिमार एक्स्प्रेसच्या डब्यात जिलेटीनच्या पाच कांड्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) येथील शालिमार एक्स्प्रेसच्या (Shalimar Express) डब्यात जिलेटीनच्या पाच कांड्या (Gelatin Sticks) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी (5 जून) सकाळी ही घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनस येथील परिसर रिकामा करण्यात आला. तसंच बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले.

शालिमार एक्स्प्रेस बुधवारी (5 जून) सकाळी शालिमार येथून एलटीटी स्थानकात पोहोचली. त्यानंतर कारशेडमध्ये उभ्या असलेल्या या एक्स्प्रेसमध्ये साफसफाई दरम्यान एका बॅगेत जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. त्यानंतर लगेचच पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

ट्विट:

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, काही संशयास्पद वस्तू लोकमान्य टिळक टर्मिनस येथील शालिमार एक्स्प्रेसमध्ये आढळून आल्या असून त्यासोबत एक पत्रही सापडले आहे. त्यात हे पॅकेट इथेच ठेव. पुढील टीम ते येथूनच घेईल, असे लिहिले होते. त्याचबरोबर पॅकेटला एक बॅटरी देखील कनेक्ट केली होती.

ANI ट्विट:

या सर्व प्रकाराचा पोलिस अधिक शोध घेत आहेत. मात्र यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनसमधील वाहतूक काही काळ खोळंबली होती तर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.