Gateway Of India: ऐतिहासिक 'गेटवे ऑफ इंडिया'ला निर्माण झाला धोका; पडू लागल्या आहेत भेगा, पुरातत्व विभागाने जारी केला अहवाल

त्याच वेळी इंग्रजांची शेवटची तुकडीही या गेटवे ऑफ इंडियामधून भारतातून निघून गेली होती आणि भारत ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला होता.

Gateway of India (Photo Credits-ANI)

मुंबईतील (Mumbai) समुद्रकिनारी असलेली ऐतिहासिक ‘गेटवे ऑफ इंडिया’ (Gateway Of India) ही वास्तू मुंबईसह महाराष्ट्राची शान आहे. मुंबईमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये ‘गेट वे ऑफ इंडिया’चा समावेश होतो. आता गेटवे ऑफ इंडिया हे चिंतेचे कारण बनले आहे. जवळजवळ 100 पेक्षा जास्त वर्षे जुनी असलेल्या या रचनेच्या पृष्ठभागावर भेगा पडल्या आहेत.

या इमारतीला 2024 मध्ये 100 वर्षे पूर्ण होतील. महाराष्ट्राच्या पुरातत्व विभागाने इमारतीच्या झालेल्या नुकसानीबाबत स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल तयार केला आहे. या अहवालात धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

राज्य पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार गेटवे ऑफ इंडियाच्या पाया आणि भिंतींना भेगा पडत आहेत. त्यामुळे इमारत कमकुवत होत असून, ती दुरुस्त करण्याची गरज आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या दुरुस्तीसाठी राज्य पुरातत्व विभागाने महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे. गेटवे ऑफ इंडिया 1924 मध्ये मुंबईत समुद्रकिनारी बांधण्यात आले होते. त्यावेळी राजा जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी ही वास्तू उभारली असल्याचे सांगण्यात येत आहे.

किंग जॉर्ज पंचम यांनी भारत भेटीदरम्यान याच दरवाजातून प्रथम प्रवेश केला होता. त्याच वेळी इंग्रजांची शेवटची तुकडीही या गेटवे ऑफ इंडियामधून भारतातून निघून गेली होती आणि भारत ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला होता. आता असा हा ऐतिहासिक वारसा लाभलेली ही वास्तू कमकुवत होत चालली आहे. काही वर्षांपूर्वी समुद्रात आलेल्या वादळामुळे गेट वे ऑफ इंडियाजवळची भिंत लाटांच्या तडाख्याने तुटली होती. तेव्हापासून त्यावर धोक्याची टांगती तालावर होती. (हेही वाचा: सिंधुदुर्ग जिल्हयात आढळला पाण्यावर तरंगणारा दुर्मिळ दगड)

गेटवे ऑफ इंडियाच्या संरक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे. याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेट वे ऑफ इंडियाच्या दुरुस्तीसाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला असल्याची ग्वाही दिली आहे. लवकरच ही रक्कम मंजूर होऊन जीर्ण झालेल्या ऐतिहासिक वास्तूची दुरुस्ती करण्यात येणार आहे.