Maharashtra Rain Alert: गणेश आगमनासह पाऊस हजेरी लावणार, आजपासून 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
परिणामी राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे बळीराजा आता संकटात आला आहे. पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या बळीराजासाठी एक सुखावणारी बातमी आता समोर आली आहे. यंदा गणपती बाप्पाचं आगमनासह आजपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. हवामान खात्याने याबाबतची अपडेट दिली आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. याशिवाय राज्यातील काही जिल्ह्यांवर आलेलं पाणी संकट दूर होऊ शकतं. (हेही वाचा - Gujarat Railway Services Disrupted: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार! रेल्वे सेवा विस्कळीत)
पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तर पूर्व बंगाल खाडीकडे सरकला आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात ढगांची जमावट होत आहे. परिणामी राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हवामान खात्याने आज राज्यातील 5 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, वर्धा, नागपूर, नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असंही आवाहन करण्यात आलं आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र, राज्याच्या काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. अशातच हवामान खात्याने मंगळवारपासून राज्यात पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.