कुख्यात गँगस्टर अरुण गवळी याची कन्या योगिता गवळी व अभिनेता अक्षय वाघमारे उद्या अडकणार विवाहबंधनात; जाणून घ्या कशी असेल तयारी
डिसेंबर 2019 मध्ये गँगस्टर अरुण गवळी (Arun Gawli) याची कन्या योगिता गवळी (Yogita Gawli) हिचा साखरपुडा, अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) याच्यासोबत झाला होता.
डिसेंबर 2019 मध्ये गँगस्टर अरुण गवळी (Arun Gawli) याची कन्या योगिता गवळी (Yogita Gawli) हिचा साखरपुडा, अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) याच्यासोबत झाला होता. आता या कोरोना व्हायरस लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) मध्ये हे जोडपे विवाहबंधनात अडकणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार उद्या, 8 मे रोजी योगिता व अक्षय विवाहबंधनात अडकत आहेत. हे लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच होणार आहे. या लग्नासाठी लॉक डाऊन नियमांचे पालन होणार असून, सुरक्षेबाबत सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत.
डिसेंबरमध्ये पुणे येथे जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत एका हॉटेलमध्ये योगिता व अक्षय यांचा साखरपुडा झाला होता. त्यावेळी 29 मार्च रोजी यांचे लग्न होणार असल्याचे समजले होते, मात्र लॉक डाऊनमुळे ते शक्य झाले नाही. आता लग्नासाठी 8 मे ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या लग्नासाठी मुंबई व पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेण्यात आली आहे. याबाबत बोलताना टाईम्स ऑफ इंडियाला अक्षयने सांगितले, ‘आम्ही आधीच लग्नाच्या परवानगीसाठी अर्ज केला होता. मंगळवारी रात्री पोलिस खात्याकडून याबाबतचा मान्यता मेल प्राप्त झाला आणि त्यानंतर आम्ही 8 मे ही लग्नाची तारीख ठरविली. 29 मार्चचा विवाहसोहळा डोळ्यासमोर ठेवून आधीच खरेदी करण्यात आली होती.’
या लग्नासाठी केवळ वधू-वरांचे कुटुंब आणि काही जवळचे मित्र-मैत्रिणीच उपस्थित राहणार आहेत. डॅडी म्हणजेच अरुण गवळी यांचे निवासस्थान, मुंबईतील दगडी चाळ येथे हे लग्न होणार आहे. हळदी सोहळा गुरुवारी होईल आणि शुक्रवारी दुपारी अक्षता पडतील. 2008 मधील हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अरुण गवळी सध्या पॅरोलवर बाहेर असून या लग्नासाठी उपस्थित राहणार आहे. (हेही वाचा: अरुण गवळी याची कन्या योगिता गवळी हिचा अभिनेता अक्षय वाघमारे याच्याशी साखरपुडा)
या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जातील, असेही अक्षयने सांगितले. तसेच उपस्थित लोकांना सॅनिटायझर आणि फेस मास्क दिले जाणार आहेत व पूर्ण स्वच्छता राखली जाणार आहे. लॉक डाऊननन्तर सर्वकाही आलबेल झाल्यावर रिसेप्शन पार पडेल.