Gang Rape in Palghar: सोळा वर्षीय मुलीवर 11 जणांकडून सामूहिक बलात्कार; 8 जणांना अटक, पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील घटना
पालघर जिल्ह्यातील सातपाटी सागरी परिसरात ही घटना घडली. पीडिता 16 वर्षांची आहे. घटनेची माहिती मिळताच सातपाटी पोलिसांनी (Satpati Police Station) प्राथमिक माहितीवरुन पाच तरुणांना अटक केली आहे.
Palghar Shocker: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape in Palghar) झाल्याच्या घटनेमुळे पालघर जिल्हा हादरुन गेला आहे. पालघर जिल्ह्यातील सातपाटी सागरी परिसरात ही घटना घडली. पीडिता 16 वर्षांची आहे. घटनेची माहिती मिळताच सातपाटी पोलिसांनी (Satpati Police Station) प्राथमिक माहितीवरुन आठ तरुणांना अटक केली आहे. तर उर्वरीत तीन तरुणांचा शोध सुरु आहे. घडल्या प्रकारामुळे पीडिता अत्यवस्थ आहे. वैद्यकीय उपचारसांसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यामध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पालघरमधील माहीम पानेरी (Mahim Paneri Village) येथे 11 तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने माहीम पोलिस चौकीत जाऊन दिली. त्यानंतर माहिती पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी प्रकरणाची दखल गांभीर्याने घेत पावले टाकली. पीडितेने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध सुरु केला. यापैकी 8 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. इतर 3 जणांचा शोध सुरु आहे. घटनेतील मुख्य आरोपी ताब्यात घेतलेले तरुणच आहेत की इतरही तरुणांचा या प्रकरणात समावेश आहे याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत. (हेही वाचा, Dombivli Gang Rape Case: डोंबिवली सामुहिक बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार- एकनाथ शिंदे)
पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी रविवारी पहाटे आठ आरोपींना अटक केली आणि त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) 376 (डी) (सामूहिक बलात्कार), 366 (ए) (प्रोक्युरेशन) तसेच अल्पवयीन मुलीसाठी, 341 (चुकीच्या पद्धतीने बंदिस्त करणे), 342 (चुकीने बंदिस्त करणे) आणि 323 (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याचे कलम आणि यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांपैकी बहुतांश गर्दच्या आहारी गेले आहेत. प्रामुख्याने ही मुले माहीम, हनुमानपाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील असल्याची माहिती आहे. पालघर येथील अनेक समुद्रकिनाऱ्यावर दिवस मावळयला आला की शुकशुकाट सुरु होतो. त्याचाच फायदा घेत इथल्या झुडपांमध्ये अनेक नशेखोर आश्रय घेतात. एकट्या व्यक्तीला गाठून त्यांची लुटमार करणे, महिलांची छेडछाड करणे, असे प्रकार येथे आढळतात. अशा हुल्लडबाड नशेखोरांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करतात. परंतू, नशेडी लोकांवर त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नाही. आता घडलेल्या प्रकारामुळे तरी त्यावर वचक यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.