Ganeshotsav in Jammu and Kashmir: पुढच्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये 8 ठिकाणी साजरा होणार सार्वजनिक गणेशोत्सव; पुण्यातील आठ गणेशोत्सव मंडळांची मोठी घोषणा
गणेशोत्सवासाठी जम्मू-काश्मीरमधील ज्या आठ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे त्यात- श्रीनगरमधील लाल चौक, पुलवामा, कुपवाडा, बारामुल्ला, अनंतनाग, खुर्हान, शोपियान यांचा समावेश आहे.
राजकीय जनजागृतीसाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव (Ganeshotsav) सुरू केला. या सार्वजनिक सणाद्वारे समाजाला एकत्र आणणे हे टिळकांचे उद्दिष्ट होते. आता याच विचाराने प्रेरित होऊन, पुण्यातील आठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठी घोषणा केली आहे. या आठ मंडळांनी मिळून जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आठ वेगवेगळ्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याचा आणि सार्वजनिक गणेशपूजेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंडळांनी सांगितले की, लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय-सांस्कृतिक चेतना जागृत करण्यासाठी आणि देशभक्ती वाढवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. यानंतर गणेशपूजेची ही परंपरा देशभर पसरली. आता जम्मू-काश्मीरमध्येही असे चैतन्य वाढवणे हा या गणेश मंडळांचा उद्देश आहे.
या आठ सार्वजनिक गणेश मंडळांनी ज्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याची योजना आखली आहे, त्यामध्ये श्रीनगरमधील लाल चौकाचाही समावेश आहे. यंदा असे 8 गणेशोत्सव मंडळे स्थापन करणे अवघड असल्याने पुढील वर्षी या घोषणेची अंमलबजावणी होईल. म्हणजेच पुढील वर्षी जम्मू काश्मीरमध्ये पुण्यातील 8 मंडळे गणेशोत्सव साजरा करतील. पुण्यातील या आठ गणेशोत्सव मंडळांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
जम्मू-काश्मीर सार्वजनिक गणेशोत्सवासाठीच्या मूर्ती पुण्यातच साकारण्यात येणार असून, त्या जम्मू-काश्मीरमधील विविध ठिकाणी नेऊन त्यांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सुरुवातीला दीड दिवसाच्या गणपतीची स्थापना होणार आहे. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी आणि काश्मिरी जनतेचा उत्साह वाढवून, त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणखी वेगाने आणण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. (हेही वाचा: पुण्यात रिक्षा प्रवास महागणार; रिक्षा भाडेदरात 4 रुपयांची वाढ, 1 सप्टेंबरपासून लागू होणार भाडेवाढ)
गणेशोत्सवासाठी जम्मू-काश्मीरमधील ज्या आठ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे त्यात- श्रीनगरमधील लाल चौक, पुलवामा, कुपवाडा, बारामुल्ला, अनंतनाग, खुर्हान, शोपियान यांचा समावेश आहे. ही योजना साकारण्यासाठी, पुण्यात मोरया कार्यकर्ता मंच स्थापन करणार असल्याचे आठ गणेश मंडळांनी मिळून ठरवले आहे. या व्यासपीठामुळे कामगारांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. गणेशोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांना तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्याची सुविधाही दिली जाणार आहे.