Ganesh Chaturthi 2020: गणेश चतुर्थीच्या सणावर यंदा COVID-19 चं सावट; यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वरूपावर मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग आणि गणपती उत्सव मंडळांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा

सध्या सुरक्षित आरोग्य हीच आपली प्राथमिकता असेल त्यामुळे सरकार जो निर्णय देईल तो मान्य असेल अशी सांमजस्याची भूमिका घेण्याच्या तयारीत मुंबईतील अनेक गणेश मंडळं आहे.

File Image of Ganpati visarjan in Mumbai (Photo credits: Facbook/Love Mumbai)

महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक असणार्‍या गणेशोत्सवावरही यंदा कोरोना व्हायरसचं सावट आहे. या पार्श्वभूमीवरच मुंबई मध्ये गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग (Param Bir Singh)यांच्यासोबत बैठक केली आहे. यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा निर्णय आता सरकार दरबारी आहे. सरकार जो आदेश देईल, जी नियमावली लागू करेल तसा यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जाईल अशी भूमिका मुंबईच्या मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे.

महाराष्ट्रात यंदा 22 ऑगस्ट दिवशी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) आहे. दरम्यान किमान दीड ते 10 दिवसांपर्यंत गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा केला जातो. मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव दहा दिवसांचा असतो. त्यामध्ये भल्या मोठ्या गणरायांच्या मूर्तीला वंदन करायला, गणेशोत्सवाची मज्जा लुटायला देशा-परदेशातून नागरिक येतात. काल (9 जून) मुंबईत झालेल्या या पोलिस आयुक्तांसोबतच्या बैठकीमध्ये मुंबईचा राजा- गणेशगल्ली मंडळ, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिंतामणी अशा महत्त्वाच्या मंडळाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.

वडाळ्याच्या जीएसबी गणेशमंडळाने यापूर्वीच यंदा भाद्रपदातील गणेश चतुर्थी ऐवजी माघ महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जाईल अशी भूमिका घेतली आहे. तर परळच्या नरे पार्कमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मूर्तीची उंची कमी केली जाणार आहे. दरम्यान सध्या सुरक्षित आरोग्य हीच आपली प्राथमिकता असेल त्यामुळे सरकार जो निर्णय देईल तो मान्य असेल अशी सांमजस्याची भूमिका घेण्याच्या तयारीत मुंबईतील अनेक गणेश मंडळं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचं सावट गहिरं आहे. देशामध्येही दिवसागणिक कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार, देशातून कोरोना संपवण्यासाठी किमान सप्टेंबरचा मध्य उजाडू शकतो.

राज्यात कोरोनाचे  काल रात्रीपर्यंत  90,787 रुग्ण रुग्ण आढळुन आले आहेत. काल, 9 जुन रोजी राज्यात 2259 कोरोना बाधीत रुग्णांची व 120 मृत्यूंची नोंद झाली आहे. दिलासादायक म्हणजे, काल नवीन 1663 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत आतापर्यंत एकूण 42,638 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक कोरोना रूग्ण आहेत. त्यामुळे गर्दी टाळण्याचं, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन करण्यात आले आहे.