गणपत्ती बाप्पा मोरया..! लाडक्या गणरायाचे राज्यभरात उत्साहात आगमन
केवळ मुंबईच नव्हे तर, अवघ्या महाराष्ट्रात आज गणरायाच्या आगमनाचा जल्लोष पहायला मिळत आहे.
मुंबई: 'मोरया... मोरया....गणपती बाप्पा... मोरया...!, एक दोन तिन चार.. गणपतीचा जयजयकार....!' असा जयघोष आणि ढोल, ताशांच्या गजरात आज अवघ्या भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गणरायाचं घराघरांमध्ये आगमन होत आहे. केवळ मुंबईच नव्हे तर, अवघ्या महाराष्ट्रात आज गणरायाच्या आगमनाचा जल्लोष पहायला मिळत आहे. आज (गुरुवार,13 सप्टेंबर) गणेश चतुर्थी असल्यामुळे आजपासून गणेशोत्सवास सुरूवात झाली. अनेक गणेशभक्तांच्या घरामध्ये बाप्पा विराजमान झाले. तर, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या मानाच्या गणपतींचेही आज दुपारपासून आगमन होत आहे.
बाजारपेठाही फुलल्या
दरम्यान, पुण्यातील श्री कसबा गणपती मंडळ, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, श्री गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशी बाग मंडळ व केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचही गणपतींची प्राणप्रतिष्ठा दुपारी बारापर्यंत होईल. तर, मुंबईतील कही मानाच्या गणपतींचे आगमन झाले आहे. उर्वरीत गणपतींचेही आगमन लवकरच होत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांनाही नवं रूप आले आहे. ग्राहक आणि विविध वस्तूंनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. ज्या भक्त मंडळींना गणेशपूजेचे, देखाव्यांचे साहित्य काही कारणांमुळे खरेदी करता आले नाही, अशा भक्तांनी बाजारपेठेमध्ये खास गर्दी केली आहे. विशेष करून दिव्यांच्या माळा, थर्माकॉलची मखर, तोरणे, तसेच अन्य सजावटीचे साहित्याला बाजारात जोरदार मागणी असल्याचे दिसते.
पहिल्याच दिवशी लालबागचा राजाला तुफान गर्दी
केवळ मुंबईच नव्हे तर, जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी भक्तांनी गर्दी केली. सांगितले जात आहे की, लालबागच्या राजाच्या इतिहासतील पहिल्या दिवसातील ही विक्रमी गर्दी आहे. पहिल्याच दिवशीची गर्दी विचारात घेता पुढचे आकरा दिवस ही गर्दी आणखी विक्रम करेल अशी शक्यता आहे.