Param Bir Singh: परमबीर सिंग यांच्याकडून न्यायालयात नवी याचिका; तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप

या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच परमबीर सिंह यांनी पुन्हा एकदा आरोप केला आहे. त्यामुळे आता या आरोपांचे पडसाद कसे उमटतात याबाबत सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Param Bir Singh (Photo Credits: IANS)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग (Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh) यांनी महाराष्ट्र सरकारने लावलेल्या चौकशीच्या विरोधात पुन्हा एकदा न्यायालयाचे दरवजे ठोठावले आहेत. परमबीर सिंह (Param Bir Singh)) यांनी न्यायालयात नवी याचिका (Petition) दाखल करत महाराष्ट्र सरकारवर पुन्हा एक नवा आरोप केला आहे. आपण केलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी राज्य सरकार आपल्यावर दबाव टाकत असल्याचे परमबीर सिंह यांनी याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर आता 4 मे या दिवशी सुनावणी होणार आहे. परमबीर सिंह यांनी राज्य सरकारमधील तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपामुळे महाराष्ट्र आणि देशभर गदारोळ झाला होता. या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच परमबीर सिंह यांनी पुन्हा एकदा आरोप केला आहे. त्यामुळे आता या आरोपांचे पडसाद कसे उमटतात याबाबत सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

परमबीर सिंह यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, राज्य सरकारने आपली तक्रार मागे घ्यावी यासाठी आपल्यावर दबाव टाकला. आपण 19 एप्रिल या दिवशी राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी आपल्याला तक्रार मागे घेण्यास सांगितले. तसेच, ही तक्रार मागे घेतली नाही तर राज्य सरकारने आपल्यावर एकापाठोपाठ अनेक गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरु केली असल्याचेही पांडे यांनी आपल्याला सांगितल्याचे परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. परमबीर सिंह यांनी राज्य सरकारवर नवा आरोप केल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांनी या आधीच मुंबई उच्च न्यायालयात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. (हेही वाचा,  परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, माजी पोलीस आयुक्तांसह अन्य 32 जणांच्या विरोधात FIR दाखल)

दरम्यान, अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह आणि इतर काही अधिकाऱ्यांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील वेगवेळ्या 22 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराज घाडगे या अकोल्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.