माजी खासदार सदाशिवराव बापूजी ठाकरे यांचे निधन
जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. लोकनेता अशी त्यांची ओळख होती. ते विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत.
माजी खासदार सदाशिवराव बापूजी ठाकरे (Former MP Sadashivrao Bapuji Thackeray) यांचे निधन झाले आहे. ते 97 वर्षांचे होते. यवतमाळ येथील खासगी रुग्णालयांत मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सदाशिवराव बापूजी ठाकरे (Sadashivrao Bapuji Thackeray)) यांच्या निधनामुळे राजकीय आणि इतरही विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दु:ख केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही माजी खासदार सदाशिवराव बापूजी ठाकरे यांचे निधन मनाला व्यथित करणारे आहे. गांधीजींचा विलक्षण प्रभाव, विनोबांचं शिष्यत्व व सर्वोदयी आचरणातून सदाशिवराव ठाकरे काकांची वैचारिक बैठक तयार झाली होती. भूदान चळवळीत त्यांचं मोठं योगदान होतं, अशी भावना व्यक्त केली आहे.
सदाशिवराव बापूजी ठाकरे यांची ओळख ज्येष्ठ गांधीवादी आणि सर्वोदयी नेते अशी होती. त्यांच्या मागे पत्नी अन्नपूर्णा, मुलगा माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र, सरोज चौधरी, रागिनी गावंडे, डॉ. मंगला निकम या मुली व मोठा आप्त परिवार आहे. सदाशिवरावांची राजकीय कारकीर्दही प्रदीर्घ राहिली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. लोकनेता अशी त्यांची ओळख होती. ते विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. (हेही वाचा, Coronavirus: ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक मुकुंद केणी यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन)
दरम्यान, सदाशिवराव बापूजी ठाकरे हे केवळ राजकीय व्यक्तिमत्वच नव्हते तर, सामाजिक कार्यातही ते अग्रेसर राहिले आहेत. तच्यांच्यावर तरुणपणापासूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी यांच्या विचारांचा पगडा राहिला. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी या कामात स्वत:ला केवळ झोकूनच दिले नाही तर, स्वत:च्या मालकीची 80 एकर जमीनही दान दिली. आयुष्यभर त्यांनी हरित क्रांतीचा पुरस्कार केला. त्यासाठी मैलोनमैल पायपीटही केली. त्यांनी ‘सिद्धांत’ नावाचे आत्मचरित्रही लिहिले.