Floods in Maharashtra: पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा; दोन हजारांहून अधिक मालट्रक, अन्य अवजड वाहने अडकली

पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने पुरग्रस्त नागरिक भयभीत झाले आहेत. या प्रलयकारी घटनेचा फटका रस्तेवहतुकीसही मोठ्या प्रमाणावर बसला आहे.

| Image only representative purpose (Photo Credits: PixaBay)

Maharashtra Monsoon 2019:  पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग (Pune-Bangalore National Highway) तर, वाहनांच्या लांबच लांब रांगांनी भरुन गेला आहे. पंचगंगा नदीला आलेल्या महापुराचे पाणी सलग तिसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर साचून आहे. त्यामुळे पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या महामार्गावर सुमारे 2 हजारांहून अधिक वाहने अडकून पडली आहेत. या वाहनांमध्ये प्रामुख्याने ट्रक आणि इतरही छोट्या मोठ्या वाहनांचा समावेश आहे.

मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीचा फटका केवळ सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur),पुणे (Pune), सातारा (Satara) जिल्ह्यालाच नव्हे तर, जवळपास अवघ्या राज्यालाच बसला आहे. पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने पुरग्रस्त नागरिक भयभीत झाले आहेत. या प्रलयकारी घटनेचा फटका रस्तेवहतुकीसही मोठ्या प्रमाणावर बसला आहे.

कोल्हापूर जिल्हात पंचगंगेला पूर आल्याने पुणे - बंगळूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. ठप्प झालेल्या वाहतुकीवर तोडगा काढण्यासाठी कराड (जिल्हा- सातारा) तालुक्यात वाठरनजीक महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला खरा. मात्र, तरीही ही वाहतूक कोंडी फुटू शकली नाही. सातारा ते सांगली जिल्ह्यातील पेठनाक्‍या दरम्यान सुमारे दीड हजारांहून अधिक ट्रक जागेवरच अडकून पडले आहेत. (हेही वाचा, देशात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या नव्या ठिकाणाची नोंद; महाबळेश्वर, ताम्हिणी येथे चेरापुंजीपेक्षाही अधिक पर्जनवृष्टीची नोंद)

कराड तालुका हद्दीत येणाऱ्या वाठार गाव परिसरात दक्षिण मांड नदीचे पाणी आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली होती. दरम्यान, कोयना धरणाचे दरवाचे काही प्रमाणात (8 फूट) कमी करण्यात आले. त्यामुळे वाहतूक काही प्रमाणात सुरु झाली. मात्र, कोल्हापूरमध्ये पूरस्थिती कायम असल्याने सांगली ते कोल्हापूर ही वाहतूक बंद होती.

दरम्यान, पूराचे पाणी घुसलेल्या शहर आणि गाव परिसरात नागरिक एकमेकांना मदत करत आहेत. परंतू, गाव, शहरांपासून काहीशा दूर अंतरावर असलेल्या महारमार्गावर ट्रक उभे करावे लागल्याने ट्रक चालकांची मात्र दैना झाली आहे. सलग तीन दिवस एकाच जागी मुक्काम करावा लागल्याने या चालकांजवळी असलेला अन्नसाठा संपला आहे. वाहतूक बंद असल्यामुळे वाहान पुढे नेता येत नाही. तसेच, वाहन सोडून जाताही येत नाही. अशा विचित्र कात्रीत हे ट्रक चालक सापडले आहेत. अशा स्थितीत त्यांना परिसरातील नागरिकांकडून मदत घेऊन दिवस ढकलावे लागत आहेत.