Flamingos Found Dead in Mumbai: विमानाशी धडक झाल्याने 40 फ्लेमिंगो पक्षी ठार, मुंबई येथील घाटकोपर परिसरातील घटना
प्राप्त माहितीनुसार ही घटना मुंबई शहरातील घाटकोपर पूर्व येथील लक्ष्मी नगर परिसरात सोमवारी ( 20 मे) घडली. एमिरेट्सच्या मुंबईत येणाऱ्या विमानाने धडक दिल्याने पक्षांचा मृत्यू झाल्याची माहती आहे.
Flamingos Accident At Mumbai Airport: विमानाची धडक होऊन जवळपास 40 फ्लेमिंगो पक्षांचा मृत्यू (Flamingos Dead) झाला. प्राप्त माहितीनुसार ही घटना मुंबई शहरातील घाटकोपर पूर्व येथील लक्ष्मी नगर परिसरात सोमवारी ( 20 मे) घडली. एमिरेट्सच्या मुंबईत येणाऱ्या विमानाने धडक दिल्याने पक्षांचा मृत्यू झाल्याची माहती आहे. वन विभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, या आधीही फ्लेमिंगो पक्षांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
विमानाचे सुरक्षीत लँडींग
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एमिरेट्स फ्लाइट EK-508 हे जवळपास 300 हून अधिक प्रवाशांना घेऊन, मुंबई विमानतळावर उतरण्याच्या काही क्षण आधी त्याची फ्लेमिंगोच्या थव्याशी टक्कर झाली. या धडकेमुळे विमानाला धोका पोहोचण्याची शक्यता होती. मात्र, कोणत्याही धोक्याशिवाय हे विमान सुरक्षीतत राहिले आणि रात्री सव्वा नऊच्या सुमारास सुरक्षितपणे उतरले.
मुके जीव हे जग सोडून गेले
दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांना फ्लेमिंगो पक्षांची मृत शरीरे अस्ताव्यस्तपणे पडलेली आढळली. नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि दिलेल्या माहितीला रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (RAWW) या एनजीओने तत्काळ प्रतिसाद दिला. तेव्हा त्यांना घाटकोपरमधील विविध ठिकाणी अनेक फ्लेमिंगो शव विखुरलेले आढळले. दृश्यांमध्ये पक्षांचे पंख तुटले होते, पाय मोडले होते आणि चोचींतून रक्त येत होते. त्यांच्यासोबत काय घडले हे कळण्यापूर्वीच हे मुके जीव हे जग सोडून गेले होते.
पक्षांच्या मृतदेहांचे होणार शवविच्छेदन
RAWW च्या पथकांनी शव बाहेर काढण्यासाठी आणि कोणत्याही फ्लेमिंगोला तात्काळ बचाव आणि वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे का हे निर्धारित करण्यासाठी शोध मोहिमेत वन विभागाच्या मँग्रोव्ह सेलच्या अधिकाऱ्यांना मदत केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त केलेल्या मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृत्यूचे नेमके कारण निश्चित केले जाईल. हा थवा ठाणे फ्लेमिंगो अभयारण्याकडे जात असताना ही धडक झाली, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दुबईला परतण्याचे ठरलेले एमिरेट्सचे उड्डाण सोमवारी रात्री उशिरा रद्द करण्यात आले आणि विमानाची कसून तपासणी करण्यात आली.
एक्स पोस्ट
व्हिडिओ
दरम्यान, फ्लेमिंगो पक्षांचा विमानाची धडक होऊन मृत्यू होणे ही घटना पाणथळ क्षेत्रांमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामांचा परिपाक असल्याचा दावा पर्यावरणवादी आणि प्राणी-पक्षी मित्रांनी तसेच काही एनजीओंनी केला आहे. एनजीओ वनशक्तीचे पर्यावरणवादी डी स्टॅलिन यांनी नवी मुंबईतील जलकुंभांभोवती बांधकाम झाल्याचा दावा केला आणि अशा प्रकारचे बांधकाम म्हणजे गुन्हेगारी असून त्याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे म्हटले.