चिपी विमानतळावर बाप्पांना घेऊन यशस्वी लॅन्डिंग
कोकणवासीयांसाठी खूषखबर ...
गणेशोत्सव हा मुंबईकर चाकरमान्यांसाठी अगदी जिव्हाळाचा विषय आहे. गणेशोत्सवासाठी अनेकजण मुंबईतून कोकणात गावकडे जातात. मात्र कोकणात प्रवास करण्यांच्या तुलनेत व्यवस्था कमी पडते. मुंबई - गोवा रेल्वे मार्गाची झालेली चाळण, रेल्वेची गर्दी पाहता आता विमानसेवा सुरू करण्याकडे लक्ष लागले आहे. कोकणात विमानसेवा सुरू करण्याची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे.
आज पहिलं लॅन्डिंग
सिंधुदुर्गामध्ये चिपी विमानतळ कधी सुरू होणार ? याकडे सार्यांचे लक्ष लागले होते. अखेर गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत चिपी विमानतळावर विमानाचं पहिलं लॅन्डिंग झालं आहे. हे विमान मुंबईहून नव्हे तर चैन्नईवरून सिंधुदुर्गामध्ये दाखल झाले आहे. हे बारा आसनी चार्टर्ड विमान होतं.
गणेशमूर्तीची स्थापना
मुंबई ते चिपी हे अंतर विमानाने तासाभरात कापता येणार आहे. आज यावेळी विमानतळावर गणेशाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. विमानतळावर दीड दिवसांचा गणपती विराजमान होईल. पुढे ही प्रथा कायम ठेवली जाईल. सिंधुदुर्गवासीयांनी या क्षण कॅमेर्यात टिपण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. विमान उतरल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
लवकरच प्रवाशांसाठी विमानसेवा होणार सुरू
कोकणात प्रवास करण्यासाठी आता लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. आजच्या यशस्वी लॅन्डिंगनंतर लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर हा लोकार्पण सोहळा रंगण्याची शक्यता आहे.