Fire Incidents in Diwali: मुंबईमध्ये या दिवाळीत फटाक्यांमुळे आगीच्या 79 घटना; उच्च न्यायालयाच्या निर्बंधानंतरही घडले अनुचित प्रकार

9 ते 15 नोव्हेंबर दरम्यान अग्निशमन अधिकार्‍यांनी सुमारे 169 व्याख्याने आयोजित केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांना फटाके फोडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करणारी सूचनाही जारी करण्यात आली.

Representational Image (File Photo)

मुंबई (Mumbai) शहरात दिवाळी (Diwali 2023) सणाच्या कालावधीमध्ये म्हणजेच नोव्हेंबर 5-10 दरम्यान फटाक्यांमुळे आगीच्या (Fire Incidents) 79 घटना घडल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर निर्बंध घातले असतानाही हा प्रकार घडला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात 27 आगीच्या घटना घडल्या. अशाच एका घटनेत जोगेश्वरी पश्चिम येथील इमारतीच्या 13 व्या मजल्यावरील बाल्कनीत रॉकेट घुसल्याने आग लागली.

‘गेल्या काही वर्षांत बाल्कनीतून किंवा उंच इमारतींच्या टेरेसवर फटाके फोडण्याचा ट्रेंड वाढला आहे. दिवाळीच्या काळात शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे’, असे अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई अग्निशमन दलाला (MFB) दररोज आग विझवण्यासाठी सरासरी 14 कॉल प्राप्त झाले. 2021 मध्ये शहराला आग विझवण्यासाठी 65 कॉल आले होते, तर गेल्या वर्षी फटाक्यांमुळे हे प्रमाण 37 होते. मुख्यतः फटाक्यांमुळे आणि दिवे किंवा इलेक्ट्रिक ओव्हरलोडमुळे दिवाळी दरम्यान आगीचे प्रमाण वाढते.

अशा घटना रोखण्यासाठी एमएफबीने झोपडपट्टी आणि चाळींमध्ये जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. 9 ते 15 नोव्हेंबर दरम्यान अग्निशमन अधिकार्‍यांनी सुमारे 169 व्याख्याने आयोजित केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांना फटाके फोडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करणारी सूचनाही जारी करण्यात आली. (हेही वाचा:Worst Drought-Hit Region: मराठवाडा ठरला राज्यातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त प्रदेश; जमिनीमध्ये ओलावा नसल्याने रब्बीच्या पेरणीवर विपरीत परिणाम)

दरम्यान, मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील एका इमारतीच्या 11व्या आणि 12व्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि ही आग लेव्हल 2 ची असल्याचे सांगितले. अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, ही आग विद्युत वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, फर्निचर, दरवाजे, घरातील वस्तू आदींपुरती मर्यादित होती. 21व्या आणि 22व्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितपणे छतावर आणले. 15व्या मजल्यावर अडकलेल्या सुमारे 7-8 लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले आणि जिन्यांमधून सुरक्षितपणे छतावर नेले.



संबंधित बातम्या