डोंबिवलीत एमआयडीसीतील गोदामाला भीषण आग, मोठ्या प्रमाणावर झाली वित्तहानी
ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
बुधवारी मध्यरात्री डोंबिवलीतील एमआयडीसीतील कपड्यांच्या गोदामाला आग लागली आहे.सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
डोंबिवलीतील एमआयडीसी फेज-२ परिसरातील शारदा प्रोसेस कंपनीच्या चार मजली गोदामाला मध्यरात्री भीषण आग लागली. कपड्यांसाठी साहित्य पुरविणाऱ्या या गोदामात कच्चा माल असल्याने या मालाने भराभर पेट घेतला. त्यामुळे आग भडकली. तसेच मध्यरात्रीची वेळ असल्याने वाऱ्यामुळे ही आग आणखीनच पेटली. परिणामी आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात धूराचे लोटही पसरले.
हेही वाचा- Mumbai Fire: बोईसर येथे फर्निचर गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत 20 दुकानं जळून खाक
या धूराचे लोण गोदामाजवळील परिसरात पोहोचल्यामुळे तेथील नागरिकांना श्वसनास त्रास होऊ लागल्याने अग्निशमन दलाचे जवाना तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आगीचे भीषण स्वरुप पाहता जवळपास 7 अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र तरीही ही आग अजूनपर्यंत आटोक्यात आणण्यात आलेली नाही.
दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनी जळून खाक झाली असून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.